नालीत पडलेल्या गायीची अथक प्रयत्नातून सुटका

मुक्या जीवासाठी धावले युवक

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
अशोक नगरमधील घटना
 
कारंजा लाड,
cow-rescued-from-a-drain शहरातील अशोक नगर परिसरात नालीमध्ये पडलेल्या गायीला सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. सामाजिक कार्यकर्ते श्याम घोडेस्वार यांच्यासह स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर गायीला नालीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
 
 
cow-rescued-from-a-drain
 
अशोक नगर परिसरात एक गाय अचानक नालीमध्ये पडल्याची घटना घडली. नालीत पडलेल्या गायीला बाहेर पडता येत नसल्याचे लक्षात येताच ही माहिती सामाजिक कार्यकर्ते श्याम घोडेस्वार यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी छोटू उके, पवन जाधव, गोलू गजभिये आणि सचिन गजभिये यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्व युवकांनी एकत्रितपणे प्रयत्न करीत नालीत अडकलेल्या गायीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि गायीची सुखरूप सुटका करण्यात आली. मुक्या प्राण्याचा जीव धोक्यात असल्याचे पाहून कोणताही विचार न करता मदतीला धावून जाणार्‍या या युवकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वातावरणात मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. केवळ माणसांप्रतीच नव्हे, तर मुक्या जीवांप्रतीही संवेदनशीलता जपणे हीच खरी माणुसकी असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले. श्याम घोडेस्वार यांच्यासह मदतीसाठी पुढे आलेल्या युवकांच्या या सामाजिक कार्याचे अशोक नगर परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.