गोंदिया,
cylinder explosion मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाची सिलिंडरच्या स्फोटाच्या आवाजाने झोप उडाली. जागे होऊन पाहतात तर संपूर्ण घर आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. कुटुंबीयांच्या आरडाओरडीनंतर शेजार्यांनी धाव घेत विद्युत मोटारपंपाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका इतका भीषण होता की, काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत वर्षभराचे धान्य, कपडे, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, संसारोपयोगी साहित्य आणि पशुधनाचा चाराही राख झाला. गोरेगाव तालुक्यातील कटंगी बु. येथे २६ व २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली.

कटंगी बु. येथील वामन सोनवणे हे कुटुंबासह घरात झोपले असताना मध्यरात्री पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला. आवाजाने संपूर्ण कुटुंब जागे झाले. यावेळी घराला आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी आरडाओरड करून शेजार्यांना मदतीसाठी बोलावले. शेजार्यांनी तातडीने धाव घेत सोनवणे कुटूंबाला बाहेर काढून विद्युत मोटारपंपाच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घरातील साहित्य बाहेर काढण्याचीही संधी मिळाली नाही. या आगीत लोकेश सोनवणे यांच्या घरातील वर्षभराचे धान्य, कपडे, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, घरगुती साहित्य तसेच पशुधनासाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. आगीने संपूर्ण घरच भस्मसात झाल्याने सोनवणे कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.cylinder explosion घटनेची माहिती मिळताच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, सरपंच इंजि. खोमेंद्र पारधी, इंजि. रिना पारधी तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आर्थिक मदत देऊन कुटुंबाला आधार दिला. तसेच शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.
अग्निशमन दलाला विलंब : ग्रामस्थांचा संताप
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजून २२ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची सूचना देण्यात आली होती. मात्र, अग्निशमन वाहन रात्री १ वाजून ४ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. म्हणजेच सूचना मिळाल्यानंतर तब्बल ४० मिनिटांनी अग्निशमन दल दाखल झाले. विशेष म्हणजे गोरेगाव येथून कटंगी बु. येथे पोहोचण्यासाठी अवघ्या आठ ते नऊ मिनिटांचा कालावधी लागतो. असे असतानाही एवढा विलंब का झाला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.