दुर्बल घटक निधीच्या वितरणावर मनपा सभेत खडाजंगी; निधी आणि ठेके रद्द करण्याची मागणी

झोपडपट्टी भागात विकासकामे झाली नसताना निधी खर्च केल्याचा आरोप; महापौरांकडून सरकारी चौकशीचे आश्वासन

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नागपूर,
demand-for-cancellation-of-funds-and-contracts नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेत दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या निधीच्या वितरणावरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. झोपडपट्टी भागांमध्ये अपेक्षित विकासकामे झाली नसताना दुर्बल घटकांसाठी निर्धारित निधी ठेकेदारांच्या माध्यमातून खर्च किंवा वितरित करण्यात आल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी उपस्थित केला.
 
Nagpur Municipal Corporation
 
या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. दरम्यान, सत्तापक्षनेते बाल्या बोरकर यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली. दुर्बल घटकांसाठी निर्धारित निधी रद्द करण्यासोबतच या निधीअंतर्गत काढण्यात आलेले सर्व ठेकेही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. दुर्बल घटकांसाठीच्या निधीचा प्रत्यक्ष लाभ गरजू नागरिकांना आणि झोपडपट्टी भागातील रहिवाशांना मिळायला हवा. ठेकेदारांच्या माध्यमातून निधी खर्च करण्याऐवजी त्याचा विनियोग गरजूंच्या विकासासाठी व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
 
या वादात महापौरांनी हस्तक्षेप करत संबंधित निधी अनेक कालावधींसाठी रद्द करण्याचे आश्वासन दिले. तसेच संपूर्ण प्रकरणाची सरकारी स्तरावर चौकशी करण्यात येईल, अशी घोषणाही केली. आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकाच मुद्द्यावर आक्षेप घेतल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता सरकारी चौकशीतून काय निष्पन्न होते आणि मनपा प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.