सिरोंचा,
mla-sudhir-mungantiwar सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकर्यांच्या धान खरेदी मर्यादेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर येथील नियोजन भवनात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत मुनगंटीवार यांनी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावर्षी शासकीय धान खरेदीसाठी प्रतिएकर केवळ 9 क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रत्यक्षात अनेक शेतकरी प्रतिएकर 20 ते 25 क्विंटलपर्यंत धान उत्पादन घेत असताना शासनाच्या मर्यादेमुळे उर्वरित धान खासगी व्यापार्यांना कमी दरात विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे प्रतिएकर 12.60 क्विंटलची मर्यादा पूर्ववत करावी किंवा प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार करून किमान 20 ते 25 क्विंटल धानाची शासकीय खरेदी करावी, अशी प्रमुख मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी शेतकर्यांनी आपल्या व्यथा आणि शेतीसाठी करावा लागणारा वाढता खर्च याबाबत सविस्तर भूमिका मांडली. त्यावर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाचे मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची माझी जबाबदारी राहील, अशी ग्वाही देत त्यांनी शेतकर्यांना दिलासा दिला. तसेच आपण सदैव शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आलेल्या या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांमुळे धान खरेदी मर्यादेचा प्रश्न शासनदरबारी पोहोचला आहे. आता शासनाकडून प्रत्यक्ष निर्णय होऊन सिरोंचा तालुक्यातील हजारो धान उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नारायणपूर परिसरातील विविध गावांतील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.