नागपूर,
smart toilet शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था अधिक आधुनिक, स्वच्छ आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रेशीमबाग मैदान परिसरात शहरातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित स्वयंचलित स्मार्ट टॉयलेट सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना या अत्याधुनिक स्वच्छतागृहाचा वापर पूर्णपणे मोफत करता येणार आहे.
दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सुविधा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी तिचा लाभ घेतल्याने या उपक्रमाला सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. स्वयंचलित फ्लशिंग व्यवस्था, दुर्गंधी नियंत्रण, हवा खेळती ठेवणारी यंत्रणा आणि मानवी मलमूत्राचे विघटन करणारे तंत्रज्ञान यामुळे स्वच्छतेची गुणवत्ता राखण्यास मदत होणार आहे. तसेच सांडपाण्याच्या पर्यावरणपूरक प्रक्रियेमुळे भूजल प्रदूषणाचा धोका कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
या सुविधेच्या वापरावर आणि स्वच्छतेवर डिजिटल प्रणालीद्वारे सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.smart toilet नागरिकांना काही तक्रार किंवा सूचना असल्यास तेथील क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन अभिप्राय नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असलेल्या या सुविधेच्या कामगिरीचा आढावा घेऊन शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही अशा स्मार्ट टॉयलेटची उभारणी करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागपूरच्या सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.