पोलिस कस्टडीतील मृत्यू प्रकरणी हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
death in police custody शेगाव पोलिस कस्टडीत झालेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर भादंवि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष रेखा विनोद गाडवे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर सुनावणी झाली. सहा वर्षे उलटूनही उत्तर न दिल्याबद्दल हायकोर्टाने राज्याच्या गृह विभागाच्या मुख्य सचिवांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते.
 

death in police custody 
 
 
याचिकाकर्त्या रेखा गाडवे यांचा मुलगा गौरव (२५ रा. इमामवाडा, नागपूर) याचा पोलिस कस्टडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. गौरव हा शेगाव येथे दर्शनासाठी गेला होता. ट्रेन सुटल्यामुळे गौरव हा पोलिस ठाण्यात मदत मागायला गेला होता. पोलिस ठाण्यातील फोनवरून गौरव हा आईसोबत बोलला की, पोलिस आतंकवादी म्हणून मारत आहे. दुसऱ्या दिवशी गौरवचा मृतदेह बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नदीत मिळाला. बाळापूर पोलिसांनी रेखा यांना सांगितले की, गौरवने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह मिळाला आहे.death in police custody याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी रेखा गाडवे यांनी २०१९ मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती. घटना घडली तेव्हा ठाण्यातील सीसीटीव्ही बंद होते. याशिवाय या घटनेची स्टेशन डायरीमध्ये नोंद नव्हती.
कोर्टाने व्यक्त केली होती तीव्र नाराजी
सुनावणीदरम्यान, सहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही राज्य सरकारतर्फे उपस्थित सहाय्यक सरकारी वकिलांनी सीसीटीव्ही फुटेजबाबत अतिरिक्त शपथपत्र सादर करण्यासाठी पुन्हा वेळेची मागणी केली होती यावर कोटार्ने तीव्र असंतोष व्यक्त केला होता. २०१९ पासून याचिका प्रलंबित असतानाही गेल्या ६ वर्षांत सीसीटीव्ही फुटेजबाबत शपथपत्र का दाखल केले गेले नाही, याबाबत खुलासा करावा, असे निर्देश हायकोटार्ने गृह विभागाच्या मुख्य सचिवांना दिले होते. रेखा गाडवे यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.