गोरेगाव,
goregaon महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समता, मानवी हक्क आणि अस्पृश्यतेविरुद्धच्या संघर्षाचा इतिहास उलगडणार्या ‘पाण्याने पेटला वनवा’ या ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला. या महानाट्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा संघर्ष प्रभावीपणे रंगमंचावर जिवंत करण्यात आला.

आमदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री इंजि. राजकुमार बडोले लिखित या महानाट्याच्या उद्घाटनाप्रसंगी स्वतः आ. राजकुमार बडोले, नाटकाच्या निर्मात्या शारदा बडोले, माजी जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, माजी पं. स. सभापती मनोज बोपचे, पं.स. उपसभापती रामेश्वर महारवाडे, कृ.उ.बा.स.सभापती गिरधारी बघेले, भाजपा तालुका अध्यक्ष अनंत ठाकरे, माजी तालुका अध्यक्ष संजय बारेवार, प्रदिप शहारे, फनिंद्र पटले आदी उपस्थित होते. दरम्यान, नाटकाच्या माध्यमातून महाड येथे झालेल्या चवदार तळे सत्याग्रहाची पार्श्वभूमी, तत्कालीन सामाजिक विषमता आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी समाजाला करावा लागलेला संघर्ष वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्यात आला.
पाणी पिण्याचा समान अधिकार मिळावा, या न्याय्य मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या आंदोलनातील वेदना, संघर्ष, स्वाभिमान आणि परिवर्तनाची चळवळ कलावंतांनी प्रभावी अभिनयातून साकारली. या नाट्यप्रयोगामुळे प्रेक्षकांना चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास जाणून घेण्यासोबतच त्या काळातील सामाजिक वास्तव आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची अनुभूती घेता आली. इतिहासातील एका महत्त्वपूर्ण सामाजिक क्रांतीचे प्रभावी चित्रण करणार्या या महानाट्याने उपस्थितांची मने जिंकली. आ. बडोले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.