भारताचा नेपाळ दौरा; तीन टी-२० सामन्यांची मालिका

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
series-of-three-t-20-titles एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील भारताच्या मोहिमेची सांगता झाल्यानंतर आता भारत ‘अ’ संघ नव्या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय संघ नेपाळच्या दौऱ्यावर जाणार असून, या ठिकाणी उभय संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही आंतरराष्ट्रीय मालिका नसली, तरी युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळणार आहे.

series-of-three-t-20-titles
भारत आणि नेपाळ यांच्यातील मालिकेला ९ डिसेंबरपासून सुरुवात होईल. पहिला सामना ९ डिसेंबरला, दुसरा सामना ११ डिसेंबरला, तर तिसरा आणि अंतिम सामना १३ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार हे तिन्ही सामने सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होतील. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवले जाणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तिलक वर्माला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळणार की नव्या खेळाडूकडे कर्णधारपद दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या मालिकेसाठी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या निवडीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने एका सामन्यात ५३ चेंडूंमध्ये २०४ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळे नेपाळविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला संधी मिळाल्यास त्याच्या फलंदाजीची झलक पुन्हा पाहायला मिळू शकते.
 
दरम्यान, डिसेंबरमध्ये भारतीय वरिष्ठ संघही श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेला १३ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, तिसरा आणि अखेरचा सामना १९ डिसेंबरला होईल.
 
वैभव सूर्यवंशीची नेपाळविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाल्यास त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी आणखी सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारत ‘अ’ संघाची घोषणा आणि कर्णधारपदाची जबाबदारी कोणाला मिळणार, यासोबतच वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळणार का, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.