मानोरा,
initiative-by-mahant-sanjay-maharaj बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता ऐतिहासिक दस्तऐवजीकरणाची जोड मिळाली आहे. संत डॉ. रामरावबापू महाराज यांनी आयुष्यभर केलेल्या आरक्षणाच्या लढ्याचा कालानुक्रमिक इतिहास, विविध आंदोलनांच्या नोंदी, शासनस्तरीय पत्रव्यवहार, ऐतिहासिक गॅझेटियर आणि सामाजिक-सांस्कृतिक पुरावे संकलित करून महंत संजय महाराज यांनी २३ नोव्हेंबर रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे निवेदनासह सादर केले आहेत. संत डॉ. रामराव महाराज सेवा आश्रम धार्मिक ट्रस्ट, पोहरादेवी यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या दस्तऐवजीकरणात १९६६ ते २०२६ या सुमारे ६० वर्षांच्या संघर्षाचा आढावा घेण्यात आला आहे.
१९६६ पासून संघर्षाची ऐतिहासिक वाटचाल
२६ ऑगस्ट १९६६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय बंजारा युवक शिबिरात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात घोषणा केल्याचा उल्लेख या दस्तऐवजांत करण्यात आला आहे. त्यानंतर १९७५ मध्ये संत डॉ. रामरावबापू महाराज यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री ब्रह्मानंद रेड्डी यांची भेट घेऊन आरक्षणाची मागणी मांडली. येथून या प्रश्नाचा राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू राहिला. १९९७ ते २००२ या कालखंडात मुंबईतील आझाद मैदानावर सातत्याने धरणे आंदोलन आणि उपोषणे करण्यात आली. २००२ मध्ये मुंबईसह दिल्लीतील जंतरमंतरवरही हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला. संत डॉ. रामराव बापू महाराज, महंत संजय महाराज यांच्यासह अनेक समाजधुरीणांनी या आंदोलनात योगदान दिले.
विधानसभेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पाठपुरावा
२००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पोहरादेवी भेटीदरम्यान आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ६ ऑगस्ट २००३ रोजी महाराष्ट्र विधानमंडळात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात ठराव पारित झाल्याची नोंद दस्तऐवजात आहे. २००६ आणि २००७ या काळात प्रधानमंत्री कार्यालय, सामाजिक न्याय विभाग आणि केंद्र सरकारकडे विविध निवेदने सादर करण्यात आली. १७ डिसेंबर २००७ रोजी संत डॉ. रामराव बापू महाराज यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ७९ पानाचे पुस्तक सादर केल्याचाही उल्लेख आहे. २०१० मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर पुन्हा मोठे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आले. २०२० मध्ये दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणाचा प्रश्न मांडण्यात आल्याची नोंद आहे. २०२२ आणि २०२३ मध्येही विविध स्तरांवर पत्रव्यवहार, ग्रामपंचायतींचे ठराव आणि निवेदनांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू राहिला.
२५-२६ मध्ये आंदोलनाला नवी दिशा
२०२५ मध्ये जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण, मानोरा तहसील कार्यालयावरील मोर्चा आणि ४ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथिगृहात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठक या घडामोडी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीची समिती स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख आहे. २२ मे रोजी समितीच्या अध्यक्षांसह विविध सुविधांबाबत शासन निर्णय जारी झाल्याची नोंदही सादर करण्यात आली आहे.
२३ सप्टेंबर २०२६ रोजी पोहरादेवी येथे अभ्यास समितीच्या अहवालाची मागणी करत सामूहिक उपोषण सुरू करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर महंत संजय महाराज यांनी २३ नोव्हेंबर रोजी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे ऐतिहासिक दस्तऐवजांसह निवेदन सादर केले.
ऐतिहासिक गॅझेटियर आणि सांस्कृतिक पुराव्यांवर भर
या निवेदनामध्ये १३०५, १३१४ आणि १५९० मधील ऐतिहासिक संदर्भ, १८७२ ते १९३१ दरम्यानचे ब्रिटिशकालीन जनगणना अहवाल, १९३६ मधील डिप्रेस्ड जमातींची यादी, बिहार व हैदराबाद गॅझेट तसेच क्रिमिनल ट्राइब्स इन्क्वायरी कमिटीच्या अहवालांचा संदर्भ देण्यात आला आहे. याशिवाय गोर बोली भाषा, पारंपरिक वेशभूषा, विवाहपद्धती, देवपूजा, तांडा संस्कृती, सामाजिक रचना आणि पारंपरिक जीवनशैली यांचाही अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामूहिक सहभागातून ऐतिहासिक दस्तऐवजीकरण या उपक्रमात महंत संजय महाराज व इतर नागरिकानी सादर केला. या दस्तऐवजीकरणाचा मुख्य उद्देश संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या संघर्षाची अधिकृत नोंद शासनाच्या अभ्यास प्रक्रियेत यावी आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी पुराव्यांसह पुढील पिढीपर्यंत पोहोचावी हा आहे.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न केवळ राजकीय आश्वासनांपुरता मर्यादित न राहता उपलब्ध ऐतिहासिक पुरावे, सामाजिक-सांस्कृतिक नोंदी आणि घटनात्मक तरतुदींच्या आधारे अभ्यासला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने दस्तऐवजांची अधिकृत पडताळणी करून आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. महंत संजय महाराज यांनी समाजबांधवांना आवाहन करताना व्यक्तिवाद, संघटनावाद आणि श्रेयवाद बाजूला ठेवून एकजुटीने ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आरक्षणाची मागणी पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.