गोंदिया,
jal jeevan mission scheme ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना गोंदिया जिल्ह्यात निधीअभावी तहानलेलीच आहे. जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या २ हजार ४८४ कामांपैकी आतापर्यंत केवळ १ हजार ३८५ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित १ हजार ९९ कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यातच पूर्ण झालेल्या काही कामांपोटी कंत्राटदारांची सुमारे ५० कोटी रुपयांची देयके मागील चार वर्षांपासून थकीत आहेत. शासनाकडून निधी मिळत नसल्याने कंत्राटदारांनी कामे थांबविली असून, ‘हर घर नल, हर घर जल’ हे शासनाचे उद्दिष्ट जिल्ह्यात प्रत्यक्षात कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने २०२१-२२ मध्ये जलजीवन मिशन योजनेला मंजुरी देण्यात आली. यानुसार गोंदिया जिल्ह्यातील ८६८ गावांमध्ये एकूण २ हजार ४८४ कामे मंजूर करण्यात आली होती. यासाठी ५६८ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये ७२७ नळ पाणीपुरवठा योजना, ७५६ अंगणवाडी केंद्रांतील पाणीपुरवठा आणि ३६८ गावांतील सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजनांचा समावेश होता. ही कामे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष कामांची गती यामध्ये तफावत निर्माण झाल्याने योजनेचे वेळापत्रक कोलमडले. आतापर्यंत सुमारे २२५ कोटी रुपये खर्च करून १ हजार ३८५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना त्यांच्या हक्काची देयके मिळालेली नाहीत. सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम थकीत असल्याने संबंधित कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.jal jeevan mission scheme परिणामी, नवीन कामे सुरू करण्यासह सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावरही परिणाम झाला आहे.
हर घर नल केवळ स्वप्नच ...
जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट असताना निधीअभावी कामे रखडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ही योजना ग्रामीण भागातील अनेक कुटूंबांसाठी स्वप्नच ठरलेली आहे. तेव्हा शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन कंत्राटदारांची थकीत देयके अदा करावीत आणि अपूर्ण कामांना गती द्यावी, अशी मागणी आता सर्वसामान्यांतून होत आहे.
जिल्ह्यातील मंजूर पाणीपुरवठा योजनांची कामे तसेच पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनस्तरावर प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करता येईल.
- अंजिक्य वानखेडे
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प.गोंदिया