अनिल कांबळे
नागपूर,
md trafficking शहरात सुरू असलेल्या एमडी (मेफेड्रोन) तस्करीच्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन ठिकाणी छापे घालून तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून १ किलो ४९३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. या तस्करीचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले असून, दोन महिलांसह आणखी सहा जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, कोतवाली हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमडी तस्करीचा खेळ सुरु असल्यानंतरही पोलिसांना माहिती नव्हती, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अब्दुल रफिक अब्दुल सत्तार (सोमवारी क्वार्टर), प्रतीक कदम आणि अब्दुल आरिफ अब्दुल कुरेशी यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तेलंगणा पोलिसांचे तीन सदस्यीय पथक नागपुरात दाखल झाले होते. नागपूर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी नियोजन केले. एमडीची खेप अब्दुल रफिकपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर प्रतीक कदम हा साथीदारासोबत एमडी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. एमडीचे कनेक्शन राजस्थान असून यापूर्वीही नागपूर गुन्हे शाखेने राजस्थानशी संबंधित अजय आणि त्याच्या दोन साथीदारांना एमडी तस्करीत अटक केली होती.
सहा संशयित पोलिसांच्या रडारवर
अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून सहा अन्य व्यक्तींची नावे समोर आले. त्यामध्ये शेख रफिक अब्दुल सत्तार, सारंग सुरेश उघडे, रोहित गणेश डेकाटे, उषा महतो, राजेश्वरी महतो आणि राजस्थानमधील अक्की यांचा समावेश आहे. प्रतीकने सारंगला ५० ग्रॅम, तर रोहितला २० ग्रॅम एमडी दिल्याची माहिती आहे. सारंगच्या माध्यमातून उषा आणि राजेश्वरी यांच्यापर्यंतही एमडी पोहोचविली जात असल्याचा संशय आहे. राजस्थानमधील अक्कीची भूमिकाही तपासली जात आहे.
स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असताना ठाण्याच्या डीबी पथकाला आणि गुन्हे शाखेच्या पथकाला त्याची माहिती का मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर पोलिसांना या नेटवर्कची माहिती तेलंगणा पोलिसांकडून मिळाली.md trafficking सध्या अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून एमडीचा मूळ स्रोत, शहरातील वितरणाचे मार्ग आणि या व्यवसायामागील अन्य व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. फरार संशयितांचा शोध लागल्यानंतर तस्करीच्या जाळ्याची व्याप्ती आणि त्यामागील सूत्रधार स्पष्ट होईल.