नागपूर,
nagpur-md-drugs-gang-attackनागपूरच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातील बेसा पररिसरात असलेल्या राजरत्न सोसायटीत पाच जणांनी हल्ला केलाय. तर यात बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली आहे.
नागपूरातील कुख्यात गुंड सुमित चिंतलवार याचा साथीदार पवन ऊर्फ मिहीर राजेंद्र मिश्रा याच्यावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसा परिसरातील राजरत्न सोसायटीत ही घटना घडली. यावेळी मिहीरच्या बचावासाठी धावलेल्या त्याच्या मित्रालाही आरोपींनी मारहाण केलीय. एकंदरीत या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून पुन्हा टोळी युद्ध चर्चेत आलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एमडी तस्करीच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूपांतर या हल्ल्यात झाले. आरोपींनी यापूर्वी मिहीरला अनोळखी क्रमांकावरून फोन करून शिवीगाळ केली होती. तसेच त्याला धमकीही देण्यात आली होती. या वादातूनच पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मिहीर मिश्रा याच्याविरुद्ध एमडी विक्री, शस्त्र बाळगणे आणि धमकी देण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला सुमित चिंतलवार याच्यासोबत एमडी तस्करीच्या प्रकरणात अटक झाली होती. दरम्यान, वाहतुकीच्या व्यवसायावरून त्याचा शुभम महल्ले याच्याशीही वाद झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.