नागपूर,
stray-dogs शहरातील रस्ते, गल्लीबोळ, उद्याने आणि शाळांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांना शाळेत जाणे, रस्त्यावर सायकल चालवणे, तर ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात फिरणेही कठीण झाले आहे. या गंभीर प्रश्नावर नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत जोरदार संताप व्यक्त केला. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, नसबंदी मोहिमेतील अनियमितता आणि एबीसी (ॲनिमल बर्थ कंट्रोल) अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
कुत्र्यांमुळे आमची अवस्था कुत्र्यांसारखी झाली
सभेतील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या एका नगरसेवकाने संताप व्यक्त करताना, ‘कुत्र्यांमुळे आमची अवस्था कुत्र्यांसारखी झाली आहे,’ अशी बोचरी टिप्पणी केली. या वक्तव्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. वारंवार तक्रारी आणि अधिकाऱ्यांना पत्रे देऊनही भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना का होत नाही, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.
नसबंदी मोहिमेवर प्रश्नचिन्ह; कुत्रा चावल्यास १० हजारांची मदत द्या
मनपाच्या नसबंदी मोहिमेवरही नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नसबंदीसाठी काढण्यात आलेले टेंडर, प्रत्यक्षात होणारी नसबंदी आणि एबीसी अभियानाचा परिणाम याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले. केवळ कागदोपत्री आकडेवारी न देता शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रत्यक्ष काय उपाय केले जात आहेत, हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या नागरिकांना उपचारांसाठी आणि आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही सभेत करण्यात आली.
भेडे लेआउटपासून शिवाजीनगरपर्यंत कुत्र्यांचा उपद्रव
भेडे लेआउट, शिवाजीनगर गार्डनसह शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा मांडण्यात आला. उद्यानांमध्ये फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्यांच्या झुंडीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण शहराची असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले.
२८० कुत्र्यांच्या क्षमतेचे डॉग शेल्टर उभारणार
भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी २८० कुत्र्यांची क्षमता असलेले नवीन डॉग शेल्टर उभारण्याची योजनाही सभेत चर्चेत आली. या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) मान्यता मिळाल्यानंतर पुढील काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
महापौरांकडून समस्येची कबुली; आयुक्तांचे १२ महिन्यांचे लक्ष्य
महापौरांनी शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांमुळे होत असलेल्या त्रासाची दखल घेत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. तर मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी पुढील १२ महिन्यांत या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसले पाहिजेत, अशी भूमिका मांडली.
एकूणच, मनपाच्या आमसभेतील या चर्चेमुळे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेपासून ते त्यांच्या व्यवस्थापनापर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता केवळ आश्वासने आणि प्रस्ताव न मांडता प्रत्यक्ष कृतीतून नागपूरकरांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीतून कधी दिलासा मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.