पुलगाव,
pulgaon संविधान दिनानिमित्त संविधानाविषयी जनजागृती करण्याचे विविध उपक्रम राबविले जात असताना पुलगाव नगर परिषदेत हजारो संविधान उद्देशिका नगर परिषदेच्या एका खोलीत धूळखात पडून असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही संविधान उद्देशिका मागील वर्षी संविधान दिनानिमित्त नागरिकांना वाटप करण्यासाठी आणण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटून गेले तरी संविधान उद्देशिका नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. दरवर्षी संविधान दिन साजरा केला जात असताना मागील वर्षीची संविधान उद्देशिका नागरिकांपर्यंत पोहोचली नसतील तर जनजागृतीचा नेमका उद्देश काय साध्य झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या २३ नोव्हेंबर रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यासाठी परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार नगर परिषद कार्यालयात सकाळी ११ वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, संविधानाविषयी मार्गदर्शन व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सर्व विभागप्रमुख, कर्मचारी तसेच नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
संविधानाचे महत्त्व केवळ शासकीय कार्यालयांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या घराघरांत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधान पत्रांचे वाटप करून त्यांना संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, लोकशाही मूल्ये आणि संविधानाच्या उद्देशिकेची माहिती देणे अपेक्षित होते.
परंतु, हजारोंच्या संख्येने संविधान उद्देशिका एक वर्षापासून नगर परिषदेच्या एका खोलीत धूळखात पडून आहेत. ती उद्देशिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षभरात कोणतीही ठोस कार्यवाही का करण्यात आली नाही? मागील संविधान दिनानिमित्त आलेल्या पत्रांचे वाटप का झाले नाही? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक ती अंमलबजावणी झाली का? यंदाच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करताना नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष का झाले? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दोन वर्षांपासुन धुळखात
नगरपरिषद उपाध्यक्ष दीपक आहुजा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही संविधान उद्देशिका नगरपरिषदेला दोन वर्षांपूर्वी मिळाली आहे. परंतु, नवीन निवडून आलेल्या समितीला अधिकृतपणे देण्यात आलेले नाही. संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू असताना याबाबत मुख्याधिकार्यांना विचारणा केली असता संविधान उद्देशिका वितरण करण्याचे जिल्हाधिकार्यांकडून आदेश आल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती नप उपाध्यक्षांनी दिली.