असरअल्ली,
asaralli-forest-range सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली वनपरिक्षेत्रात अवैध सागवान तस्करीविरोधात वनविभागाने अवघ्या 72 तासांत तीन धडक कारवाया केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध सागवान लाकूड जप्त करण्यात आले असून, कोपेला उपक्षेत्रात रानडुकराच्या शिकारीचे प्रकरणही उघडकीस आले आहे. या कारवायांमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध वनव्यवसायाचे गंभीर स्वरूप समोर येत आहे.
विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडापासून नियोजनबद्ध पद्धतीने खाटांची निर्मिती केली जात असल्याचे छायाचित्रांवरून दिसून येत आहे. तयार केलेल्या लाकडी साहित्याची तेलंगणा राज्यात तस्करी करण्याचे नियोजन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा व्यवसाय काही दिवसांपुरता मर्यादित नसून, काही व्यक्तींकडून दीर्घकाळापासून संघटित पद्धतीने सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संपूर्ण तस्करी साखळीचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
21 नोव्हेंबर रोजी असरअल्ली वनपरिक्षेत्रातील एका शेतात छापा टाकून वनविभागाने 1.17 घनमीटरचे 20 नग सागवान लाकूड जप्त केले. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी पहाटे कोपेला उपक्षेत्रात रानडुकराच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आणले. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता दुबापल्ली येथे पुन्हा कारवाई करून अवैध सागवानाचा साठा जप्त करण्यात आला. तिन्ही प्रकरणांतील संशयितांची ओळख निष्पन्न झाल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आणि उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी अजिनाथ पानगे, क्षेत्र सहाय्यक मारोती वाघमारे, वनरक्षक व वनसंरक्षण मजुरांनी ही मोहीम राबविली.
वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने केलेल्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. केवळ सागवान जप्तीपुरती कारवाई न ठेवता या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, लाकूड प्रक्रिया करणारे आणि संभाव्य वाहतूक साखळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कर्तव्यदक्ष वनअधिकारी आणि कर्मचार्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढविण्याची गरजही व्यक्त होत आहे.