नवी दिल्ली,
packaged-food-health-warningपॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये मीठ, साखर आणि सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असल्यास आता ग्राहकांना पॅकेटवरच धोक्याचा इशारा देणारे लेबल दिसणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वं आणि नियम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ वरुन मिसळलेली साखर किंवा फॅट नव्हे, तर खाद्यपदार्थात असलेली एकूण साखर आणि सॅचुरेटेड फॅट यालाच इशाऱ्याचा निकष मानण्यात यावं, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं सांगितलं की, मीठ, एकूण साखर आणि सॅचुरेटेड फॅटची कमाल मर्यादा नव्याने निश्चित केली जावी. इशाऱ्यासाठी ठरवलेली मर्यादा इतकी कमी नसावी की प्रत्येक पॅकेटवरच इशारा छापावा लागेल आणि इतकीही जास्त नसावी की आरोग्याला हानी पोहोचवणारे प्रमाण त्यातून सुटून जाईल.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार, खाद्यपदार्थाच्या पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागावर 3 स्वतंत्र षटकोन तयार करावेत. त्यामध्ये अनुक्रमे High Fat, High Sugar आणि High Salt असे स्पष्टपणे लिहिले जावे.
प्रत्येक षटकोन पॅकेटच्या मुख्य क्षेत्राच्या किमान 4 ते 5 टक्के जागा व्यापेल, याची काळजी घ्यावी. या षटकोनांमध्ये लिहिलेल्या शब्दांचा फॉन्ट इतका मोठा आणि स्पष्ट असावा की सर्वसामान्य ग्राहकांना तो सहज वाचता येईल.