नवी दिल्ली,
packaged food products पॅकेटबंद खाद्यपदार्थांमधील मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटचे अधिक प्रमाण ग्राहकांच्या लक्षात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) यासंदर्भात नवीन नियम तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, केवळ बाहेरून मिसळण्यात आलेली साखर किंवा चरबी नव्हे, तर खाद्यपदार्थातील एकूण साखर आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण विचारात घेऊन इशारा देण्याची व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने खाद्यपदार्थांमधील मीठ, एकूण साखर आणि सॅच्युरेटेड फॅटसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यासाठी पॅकेटच्या दर्शनी भागावर तीन स्वतंत्र षटकोनी चिन्हे असावीत. त्यामध्ये 'हाय फॅट', 'हाय शुगर' आणि 'हाय सॉल्ट' असे स्पष्टपणे नमूद करावे. प्रत्येक चिन्ह पॅकेटच्या दर्शनी भागातील निर्धारित जागा व्यापणारे असावे आणि त्यावरील अक्षरे मोठी व सहज वाचता येण्यासारखी असावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
लहान मुले आणि तरुणांमध्ये पॅकेटबंद खाद्यपदार्थांचे वाढते सेवन लक्षात घेता, त्यातील घटक आणि संभाव्य आरोग्यविषयक परिणामांची माहिती ग्राहकांना मिळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. यासाठी FSSAI ने नियमांचा मसुदा तयार करून संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागवाव्यात आणि त्यानंतर हे नियम लवकरात लवकर अंतिम करून अधिसूचित करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले.packaged food products 'फ्रंट ऑफ पॅक वॉर्निंग लेबल' (FOPL) लागू करण्यासंदर्भातील या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा आठवड्यांनंतर होणार असून, त्यावेळी नियमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.