ममता बॅनर्जी गटाला न्यायालयाचा दिलासा; विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती रद्द

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
कोलकाता,
mamata-banerjee पश्चिम बंगालच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, कलकत्ता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला मोठा धक्का दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष रतिंद्र बोस यांनी ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी, तर अख्रुझमान यांची विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच पुढील १० दिवसांत या दोन्ही पदांवर नव्याने नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

mamata-banerjee 
 
या निर्णयामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस गटाला दिलासा मिळाला आहे. ऋतब्रता बॅनर्जी आणि अख्रुझमान हे तृणमूल काँग्रेसमधून वेगळ्या झालेल्या 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' या गटाशी संबंधित आहेत. या दोघांच्या नियुक्तीला ममता बॅनर्जी यांच्या गटाने न्यायालयात आव्हान दिले होते.
 
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या नियुक्तीच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अध्यक्ष रतिंद्र बोस यांनी बंडखोर गटाच्या ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपद, तर अख्रुझमान यांना मुख्य प्रतोदपद दिले होते. या निर्णयाविरोधात चट्टोपाध्याय यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
 
यापूर्वी न्यायालयाच्या एका खंडपीठाने या दोन्ही आमदारांना दोन महिन्यांच्या अंतरिम कालावधीसाठी पदावर कायम राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, १८ ऑक्टोबर रोजी ही मुदत संपल्यानंतर चट्टोपाध्याय यांनी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली. अंतरिम मुदत संपल्यानंतरही या दोघांना पदावर राहण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पदांशी संबंधित सरकारी सुविधांचा लाभ घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
 
या प्रकरणाची सुनावणी करताना कलकत्ता उच्च न्यायालयाने दोन्ही नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद या पदांवर नव्याने नियुक्ती करावी लागणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला पुन्हा एकदा राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.