धर्मगुरू आमदार बाबुसिंगजी महाराज यांची मंत्रालयातील बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर भूमिका

एसटी आरक्षणासह १३ सवलती लागू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
वाशीम,
mla babusingji maharajs मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मंत्रालयात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बंजारा समाजाचे धर्मगुरू तथा आमदार बाबुसिंगजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्कांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न शासनासमोर मांडले. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
 

mla babusingji maharajs 
 
 
या प्रश्नावर शासनाने आवश्यक घटनात्मक व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार बाबुसिंगजी महाराज यांनी केली. बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचे नुकसान होऊ नये, यासाठी धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या १३ सवलतींच्या धर्तीवर बंजारा समाजालाही समतुल्य सवलती लागू कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, रोजगार व कौशल्य विकासाशी संबंधित सवलतींचा लाभ बंजारा समाजाला देण्यात यावा. वन विभाग तसेच महसूल विभागाच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून पिढ्यांपिढ्या वास्तव्यास असलेल्या बंजारा समाजातील नागरिकांच्या निवासाचा व जमिनीच्या हक्काचा प्रश्न मार्गी लावावा, अशा तांड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांसाठी प्रचलित कायदे व नियमांच्या अधीन राहून स्पष्ट नियमावली आणि स्वतंत्र धोरण तयार करावे. पात्र रहिवाशांना कायदेशीर संरक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा. राज्यातील तांड्यांमध्ये शाळा, अंगणवाडी, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, वीज, गटारे, स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र तांडा वस्ती विकास प्राधिकरण स्थापन करावे. तांड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी व प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी. प्रत्येक तांड्याचा स्वतंत्र विकास आराखडा स्थानिक नागरिकांच्या सहभागातून तयार करावा. ग्रामसभेची मान्यता घेऊन आवश्यक विकासकामे निश्चित करावीत आणि पुढील तीन वर्षांत मूलभूत विकासकामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा.
जनगणनेनंतर ७०० लोकसंख्येच्या निकषानुसार पात्र असलेल्या तांड्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. पात्र तांड्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा लाभ मिळावा आणि त्यांना स्वतंत्र विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आणि महसुली गावाचा दर्जा मिळण्यासाठी पात्र असलेल्या तांड्यांचे प्रस्ताव तातडीने मागवावेत. प्रलंबित प्रस्तावांची छाननी करून पात्र तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देण्याची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी. पोहरादेवी व उमरीगड परिसरातील विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि देवस्थान व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा तयार करावा. तसेच बंजारा समाजाची बोलीभाषा, लोककला, साहित्य, परंपरा आणि गौरवशाली इतिहास यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीचे कामकाज गतिमान करून समाजाच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम राबवावे. तसेच यावेळी अनेक प्रश्न मांडण्यात आले. या बैठकीत मांडण्यात आलेल्या तांडा विकासाच्या प्रश्नांची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र तांडा वस्ती विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी, पुढील तीन वर्षांत विकासकामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या.mla babusingji maharajs तसेच जनगणनेनंतर ७०० लोकसंख्येच्या निकषानुसार पात्र तांड्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करणे, पात्र तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देण्याची प्रक्रिया गतिमान करणे, पोहरादेवी येथील विकासकामांसाठी देखरेख समिती स्थापन करणे आणि देवस्थान व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा तयार करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. या बैठकीस महंत सुनील महाराज, मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, देवानंद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, भक्तराज महाराज, अ‍ॅड. विनोद चव्हाण, स्वीय सहाय्यक निलेश जाधव, अक्षय राठोड, अजय महाराज यांच्यासह बंजारा समाजाचे विविध पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
छायाचित्र - बैठकीला उपस्थित महसुल मंत्री बावनकुळे, आ. बाबुसिंह महाराज व अन्य