अनिल कांबळे
नागपूर,
car crashed भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या दुकानाची भिंत फोडून आत घुसली. महाकाळकर सभागृह मार्गावर बुधवारी मध्यरात्री हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की दुकानाच्या भिंतीचे नुकसान झाले, तर कारचा पुढील भागही चांगलाच क्षतिग्रस्त झाला. सुदैवाने, अपघातावेळी कारमधील एअरबॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले. ही घटना दिवसा घडली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-३१-एफआर-२२१६ क्रमांकाची कार बुधवारी रात्री महाकाळकर सभागृह मार्गावरून जात होती. दरम्यान, कारचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची चर्चा आहे. अनियंत्रित कार रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या भिंतीवर आदळली आणि भिंत फोडून थेट दुकानात घुसली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. धडकेमुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, कारमधील एअरबॅग तत्काळ उघडल्याने चालकाला गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.car crashed घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चालकाची चौकशी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या माहितीनुसार, अपघातानंतर दोन्ही पक्षांमध्ये आपसात समझोता झाला.