जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक नेत्र विभागाचा शुभारंभ

अद्ययावत सुविधांच्या निर्मितीतून आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
वाशीम,
district hospital जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक नेत्र विभाग तसेच अद्ययावत कार्डियाक कॅथ लॅब सुरू करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी विविध सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून, त्याचा गरीब व गरजू रुग्णांना लाभ मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज, २७ नोव्हेंबर येथे केले. जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक नेत्र विभागाचे लोकार्पण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
district hospital
 
 
यावेळी नगराध्यक्ष अनिल केंदळे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल कावरखे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सतिन मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस. ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अविनाश पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री भरणे म्हणाले की, नव्याने लोकार्पण करण्यात आलेल्या या नेत्र विभागात राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू व इतर नेत्रविकारांच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. याशिवाय नेत्ररोगांचे अचूक निदान व उपचारासाठी ओसीटी एचडी (डोळ्यांच्या पडद्याची सूक्ष्म तपासणी करणारे यंत्र), याग लेझर, फंडस कॅमेरा, डिजिटल फोरोप्टर, पेरिमीटर, नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि स्लिट लॅम्प यांसारखी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे या नेत्र विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. खासगी रुग्णालयांतील लाखो रुपयांचा खर्च सामान्य, शेतकरी व कष्टकरी कुटुंबांना परवडणारा नसतो. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून वाशीममध्येच कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीची यंत्रणा उभी केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी व ज्येष्ठांनी डोळ्यांच्या किंवा आरोग्याच्या कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता जिल्हा रुग्णालयातील या मोफत व अत्याधुनिक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नेत्र विभागात अद्ययावत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळणार असून, जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सुविधांची निर्मिती करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्डीयाक कॅथलॅबची पाहणी लवकरच लोकार्पण
नेत्र विभागाच्या लोकार्पणानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटची पाहणी केली. या कार्डियाक कॅथलॅबचे लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या युनिटमध्ये मुख्य कार्डियाक ओटी आणि कॅथलॅबसह प्री व पोस्ट-ऑपरेटिव्ह आयसीयू, स्वतंत्र कन्सोल रूम, इको आणि टीएमटी तपासणी कक्ष यासह अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे.district hospital हृदयविकाराचा झटका आल्यास पहिल्या काही तासांत म्हणजेच ’गोल्डन अवर’मध्ये जिल्ह्यातच तातडीने अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणे शक्य होणार आहे. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हे उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असतील, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्य यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.