us-tariff-on-india-trade-warअमेरिकेने भारतासह अनेक देशांवर नवीन टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टॅरिफ वॉर सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. उत्पादन गरजेपेक्षा जास्त होत असल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) कलम 301 अंतर्गत चौकशी केली. या चौकशीनंतर टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
अमेरिकेने भारताच्या प्रमुख उत्पादन योजनांनाही लक्ष्य केलं आहे. या प्रस्तावानुसार, भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला जाण्याची शक्यता आहे. परंतु, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्यास हा टॅरिफ कमी करून 17 टक्के करण्याचाही प्रस्ताव आहे. दरम्यान, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अमेरिकेच्या चौकशीत करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे, की या नोटिशीचा सध्या विचार सुरू आहे. चौकशी सुरू करण्याच्या नोटिशीला उत्तर देताना आणि त्यानंतर झालेल्या चर्चेतही भारताच्या वाणिज्य विभागाने स्पष्ट केलं होतं की, भारतातील कोणत्याही क्षेत्रात गरजेपेक्षा जास्त उत्पादन करण्याची क्षमता नाही.
मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. व्यापाराबाबतचे कोणतेही प्रश्न या चर्चेतूनच सोडवले पाहिजेत, अशी भारताची भूमिका आहे. भारत-अमेरिका व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भारत सरकार अमेरिकेसोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.
यूएसटीआरने म्हटलं आहे की, भारताच्या उत्पादन योजनांमुळे देशातील उद्योगांची क्षमता वाढली आहे. परंतु, अमेरिकेनं या वाढीला 'अनुचित' ठरवले असून, त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होत असल्याचा दावा केला आहे.