पालकमंत्र्यांकडून बल्लारपूर पाणी पुरवठा योजनेची पाहणी

दुष्काळी परिस्थितीत पाणी काटकसरीने वापरा

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
use-water-sparingly-in-drought-conditions कमी पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बल्लारपूर वासियांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या वर्धा नदीमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील उन्हाळ्यापर्यंत टिकविणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी, गुरुवारी वर्धा नदीवरील सुधारीत बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा-2 ची पाहणी करून यंत्रणेला निर्देश दिले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
 

use-water-sparingly-in-drought-conditions
 
आगामी काळात पाण्याचे संकट आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता बल्लारपूर नगर परिषद प्रशासनाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. बंद पडलेल्या बोअरिंग आणि विहिरींची दुरुस्ती करावी. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे सिमेंटीकरण करावे. ज्या विहिरींचे पाणी नागरिक वापरत नाही, अशा विहिरी पाणी पातळी वाढविण्यासाठी उपयोगात पडू शकतात का, याबाबत नियेाजन करावे, अशा सुचना डॉ. उईके यांनी दिल्या.
 
 
सन 2011 च्या जनगणनेनुसार बल्लारपूर शहराची लोकसंख्या 89 हजार 472 असून सन 2050 पर्यंत अंदाजित लोकसंख्या 1 लाख 43 हजार राहू शकते. सन 2020 मध्ये पाण्याची गरज प्रतिदिन 19.15 दस लाख लीटर होती. सन 2050 पर्यंत ही गरज 26.69 दस लाख लीटर प्रतिदिन राहू शकते. सध्या बल्लारपूर शहरात एकूण 11 हजार 10 नळजोडणी आहे. शहराला नियमित करण्यात येणारा पाणीपुरवठा 17 दस लाख लीटर आहे. सद्यस्थितीत 10 टक्के कपातीनंतर 15 दस लाख लीटर पाणी पुरवठा चालू आहे. वर्धा नदिपात्रातील पुरेसा पाणीसाठा फेब्रुवारी 2027 अखेरपर्यंतचा असून संभाव्य पाणी टंचाई करीता निम्न वर्धा प्रकल्पातून मार्च ते ऑगसट 2027 पर्यंत 2.65 द.ल.घ.मी. आवश्यक आरक्षण करण्याचे नियोजन आहे. पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, हरीश शर्मा आदी उपस्थित होते.