भंडारा,
vidarbha युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि सांस्कृतिक वारसा जपला जावा, या उद्देशाने शासनाकडून लाखो रुपये खर्चून जिल्हा स्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवाचा केवळ 'कुळाचार' पार पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विविध स्पर्धांना युवक-युवतींचा अत्यंत नगण्य प्रतिसाद मिळाल्याने, "आलेला प्रत्येक स्पर्धक बक्षीस घेऊन गेला" अशी उपहासात्मक परिस्थिती निर्माण झाली होती.

भंडारा येथील संताजी मंगल कार्यालयात झालेला हा युवा महोत्सव खरंच जिल्हास्तरीय होता की खानापूर्ती सोहळा असेच चित्र काल होते. आधी १९ नोव्हेंबर रोजी होणारा क्रीडा महोत्सव, दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने शाळा, महाविद्यालयातील स्पर्धक येणार नाहीत याची जाणीव झाल्याने २६ ला घेण्याचा निर्णय झाला. पण शेवटी प्रशासनाची शंका खरी ठरली. या महोत्सवासाठी प्रचार आणि प्रसार केला होता, असा दावा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात स्पर्धेच्या ठिकाणी ना युवा प्रेक्षक, ना स्पर्धकांची गर्दी! १५ ते २९ वयोगटातील महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यायचा होता. पण लोकनृत्य प्रकारासाठी लाेकनृत्य प्रकारात १ समूह, लोकगीतासाठी २ आणि पथनाट्यासाठी ३ समूह आले होते. बक्षीस मात्र, प्रत्येक प्रकारासाठी एक ते तीन क्रमांकाचे देणार होते. त्यामुळे आलेला प्रत्येक जण बक्षीस घेऊन गेला, एवढेच नाही तर काही प्रकारात बक्षीस घ्यायलाही स्पर्धक नव्हते, यापेक्षा दुसरी अनास्था काय असू शकते. नगण्य असलेले युवा प्रेक्षक, स्पर्धकांची वाणवा पहाता संबंधित शासकीय विभागाने केलेला प्रचार नेमका कोणापर्यंत पोहोचला, प्रश्न उपस्थित होतो. जर युवकांचा सहभागच नसेल, तर ही प्रशासनाची की युवा पिढीची अनास्था, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यांच्यासाठी लाखाे रुपये खर्चुन हा खटाटोप केला जातो, त्या तरुणांनाच याचे गांभीर्य नसेल आणि शासकीय यंत्रणा केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यात धन्यता मानत असेल, तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय कशासाठी करायचा?
या महोत्सवात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या व्यासपीठापर्यंत आणण्यात शिक्षकांचाही निरुत्साह स्पष्टपणे दिसून आला. मग अशा महोत्सवातून सांस्कृतिक कलागुणांची वृद्धी कशी होणार? अशा दिशाहीन आयोजनातून काहीही साध्य होणार नसून, संपूर्ण यंत्रणाच या निमित्ताने निकामी ठरल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.vidarbha दरम्यान जेथे सांस्कृतिक जाणच नाही, तेथे अशा महोत्सवाचे आयोजन करून केवळ सोपस्कार आटोपताना हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी काम केल्याचं समाधान मिळते का? आणि जे बक्षीस घेउन गेले त्यांचे समाधान झाले का? याचा विचार त्यांनीच करावा.
शाळा महाविद्यालयांना पत्र पाठवून सहभागी होण्याचे आवाहन केले. महोत्सव चांगला व्हावा म्हणून शिस्तबद्ध नियोजन केले. परंतु युवकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. आमचा विभाग क्रीडा असतानाही, सांस्कृतिक आयोजन यशस्वी व्हावे म्हणून प्रयत्न केले. नेहरू युवा केंद्राचे सहकार्य अपेक्षित हाेते, असे सांगताना जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी मागील काही वर्षाच्या तुलनेत महोत्सव चांगला झाला म्हणून आपल्या विभागाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.