विजय माहुरे
सेलू,
winter-session शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाकडून शेतकर्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते ती मदत हिवाळी अधिवेशनापूर्वी मिळतील काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. दिवाळी सणाच्या पृष्ठभूमीवर ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, दिवाळीचा सण उलटून गेला तरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही मदत जमा झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करणार्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे कोरडा दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे तसे पाऊलं सरकारने उचलले आहे. शेत शिवारात लोकप्रतिनिधी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्राम पंचायत अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन सर्वे केला तसा अहवाल शासनाला पाठविला त्या नंतर शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची घोषणा राज्य शासनाने केली. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट, वाढता शेती खर्च आणि रब्बी हंगामाची तयारी अशा अनेक अडचणींनी शेतकरी आधीच त्रस्त आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून सेलू तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात आला. पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात आधार ठरणार होती. दिवाळीपूर्वी ही मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. काहींना मिळाली मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असली तरी अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मदत मिळालेल्या आणि मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांमधील हा फरक चर्चेचा विषय ठरत आहे. तांत्रिक अडचणी, लाभार्थी यादीतील त्रुटी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदत रखडली आहे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आता राज्याचे हिवाळी अधिवेशन जवळ येत असताना अधिवेशनापूर्वी दुष्काळी मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार काय? तसेच मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना न्याय मिळणार काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित मदतीचे वितरण तातडीने करावे, तसेच पात्र असूनही मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी वंचित शेतकरी करीत आहेत.
शेत शिवारात असणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी दिवसागणिक खोल जात असल्याने रब्बी हंगाम घेत असलेल्या शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे. सेलू बागायती तालुका असल्याने केळीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. तर उन्हाळी पिके यामुळे शेतकर्यांना घेता येणार नसल्याने आर्थिक बाजू कमकुवत होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात होत असल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळण्याची आशा वाढली आहे.