अखेर ‘त्या’ गोळीबारातील जखमी युवकाचा मृत्यू

- मृत्यूशी झुंज ठरली अपयशी; उपचारादरम्यान पहाटे घेतला अखेरचा श्वास

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
arjun ladse मानेवाडा रिंग रोड परिसरात वाढदिवसाच्या पार्टीत मध्यरात्री झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या अर्जुन सुनील लाडसे याचा आज शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून जीवन-मृत्यूशी झुंज देणाऱ्या अर्जुनची अखेर प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात कलमवाढ करून हत्येचे कलम समाविष्ट केल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्य आरोपी शैलेश हिरामण गुल्हाने याच्यासह या प्रकरणातील अन्य संबंधितांच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
 
अर्जुन सुनील लाडसे
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही तरुण शैलेश गुल्हाने याच्या घरासमोर जमले होते. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या शैलेशने आपल्याकडे पिस्तूल असल्याचे सांगत घरातून पिस्तूल आणले. सुरुवातीला हवेत गोळी झाडल्यानंतर दुसरी गोळी अर्जुनच्या दिशेने झाडण्यात आली. ती थेट त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस लागली. गोळी डोक्यातच अडकल्याने अर्जुनची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तदाब कमी झाल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली होती. त्यास ब्रेन डेथ घोषित करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु होता. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच अखेर पहाटे त्याचा मृत्यू झाला. अर्जुनच्या मृत्यूमुळे या प्रकरणाचे स्वरूप बदलले आहे. सुरुवातीला गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अर्जुनवर उपचार सुरू असताना पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.arjun ladse मात्र, त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात कलमवाढ करून हत्येचे कलम समाविष्ट केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एका हत्या प्रकरणात शैलेश गुल्हाने याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्या प्रकरणातून तो निर्दोष सुटल्याची माहिती आहे. आता पुन्हा हत्या प्रकरणातील गंभीर आरोपांना सामोरे जाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पोलिस तपास आणि न्यायालयीन कारवाईकडे लक्ष लागले आहे.
 
आरोपींनी केली बनवाबनवी
गोळीबारानंतर स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी वेगळाच घटनाक्रम पुढे आणल्याचा आरोप आहे. अर्जुन आणि पीयूष मेंढे दुचाकीने जात असताना मानेवाडा दहनघाटाजवळ स्कूटीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविल्यानंतर प्रत्यक्ष गोळीबाराचा घटनाक्रम वेगळाच असल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अज्ञात हल्लेखोराची कहाणी रचण्यात आली होती का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी शैलेश गुल्हाने याच्यासह पीयूष मेंढे, भावेश राव, पराग चौधरी आणि ऋषिकेश जांगजोडे यांना अटक केली आहे. न्यायालयाने पाचही आरोपींना २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.