तिचा झाला आता ‘त्याचा’ झिम्मा!

‘झिम्मा 3 चित्रपटाचे काम सुरु

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
zimma-3-comeback‘सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले…’ या बहुचर्चित काव्यओळी असलेला ‘किल्ला’ चित्रपट अनेकांच्या आजही लक्षात असेल. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणाऱ्या आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावणाऱ्या या चित्रपटातील मुख्य बालकलाकार चिनू म्हणजेच अभिनेता अर्चित देवधर आता तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 3’मधून तो मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे.
 

zimma 3 
‘झिम्मा 3’मधील निवडीबद्दल आणि या संधीच्या अनपेक्षित प्रवासाबद्दल अर्चित सांगतो, “या चित्रपटात अभिनयाची संधी मला अनपेक्षितपणे मिळाली. हेमंत ढोमे यांनी अचानक इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं असल्याचं सांगितलं. मी आणि साजिरी जोशी एकमेकांना फॉलो करतो. त्यामुळे साजिरीच्या फॉलोइंग लिस्टमधून त्यांनी माझं प्रोफाइल पाहिलं आणि मी ‘किल्ला’मध्ये काम केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मी मुंबईत येऊन त्यांची भेट घेतली.
विशेष म्हणजे, या व्यक्तिरेखेसाठी माझं ऑडिशनही झालं नाही. त्यांना हवी असलेली व्यक्तिरेखा मीच साकारू शकतो, हे त्यांच्या मनात आधीच निश्चित होतं. शिक्षण पूर्ण करून पुण्यात माझे व्यवसाय सांभाळत असताना इतक्या वर्षांनंतर पुन्हा अशा प्रकारे अभिनयाची संधी मिळणं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं.
एकतर ‘झिम्मा 3’सारख्या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा भाग होता येत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टच इतकी जबरदस्त आहे की, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास आहे. सेटवर प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवणारा होता. त्यामुळे मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो.”