‘उम्मीद’ उपक्रमातून विद्यार्थिनींना १०० सायकलींचे वाटप

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
वाशीत,
100-bicycles-distributed-to-female-students मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आरबीएल बँकेच्या ‘उम्मीद’ या सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत वाशीम येथील वंचित घटकांतील विद्यार्थिनींना १०० सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्यासह आरबीएल बँकेचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. घरापासून शाळेचे अंतर अधिक असल्याने अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात.
 
 
100-bicycles-distributed-to-female-students
 
काही विद्यार्थिनींना शाळा सोडण्याची वेळही येते. ही समस्या लक्षात घेऊन ‘उम्मीद’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधेमुळे त्यांना शाळेत नियमित उपस्थित राहणे सुलभ होणार असून, सुरक्षित व पर्यावरणपूरक वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमण्यकुमार म्हणाले, शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे.
 
 
‘उम्मीद’ उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या दर्जेदार शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. सायकली आणि शालेय साहित्याचे संच उपलब्ध करून देत तरुण मुलींना त्यांच्या अडचणींवर मात करून शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक मुलाला शिकण्याची, प्रगती करण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळावी, यासाठी अधिक समावेशक आणि समानतेवर आधारित समाजनिर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आरबीएल बँकेचा ‘उम्मीद’ हा उपक्रम देशभरातील वंचित समुदायांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. सायकली आणि शालेय साहित्याच्या संचांचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडथळे दूर करण्यावर बँकेचा भर आहे.