कारंजा लाड,
navodaya-examination जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणार्या प्रवेश परीक्षेला कारंजा तालुयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेसाठी एकूण १ हजार १९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रविष्टता घेतली होती. त्यापैकी सुमारे १ हजार ७४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहून आपले भविष्य घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. तर ११७ विध्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार्या या परीक्षेकडे विद्यार्थी व पालकांचे विशेष लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर कारंजा शहरात परीक्षेच्या आयोजनासाठी शैक्षणिक यंत्रणेकडून आवश्यक नियोजन करण्यात आले होते. शहरातील एम. आर. नागवानी इंग्लिश स्कूल, मुलजी जेठा हायस्कूल, जे. सी. हायस्कूल, विद्यारंभ इंग्लिश स्कूल आणि विद्याभारती इंग्लिश स्कूल या पाच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व केंद्रांवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच परीक्षेच्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी संबंधित केंद्रांवरील यंत्रणा कार्यरत होती.एकूण १,१९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्टता घेतली असताना जवळपास १,०७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे सुमारे ११७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे चित्र दिसून आले. आता या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले असून, आपल्या पाल्याला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.