नवी दिल्ली,
a-major-crisis-due-to-ai-in-2027 कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर जगासाठी नवी आव्हाने निर्माण करू शकतो, असा इशारा AI संशोधक निकोला जुर्कोविच यांनी दिला आहे. २०२७ मध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कुटुंबीयांना किमान दोन आठवडे पुरेल इतके अन्न, पाणी आणि रोख रक्कम घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
निकोला जुर्कोविच हे AI प्रणालींच्या संभाव्य धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या METR या ना-नफा संस्थेशी संबंधित आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर खुले पत्र प्रसिद्ध करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान प्रगतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या विषयाची अनेक वर्षांपासून काळजी वाटत असल्याचे सांगत, आता याबाबत जाहीरपणे बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जुर्कोविच यांच्या मते, AI प्रणालींची क्षमता वाढत गेल्यास सायबर हल्ले आणि माहितीची चोरी यांसारख्या घटनांचे स्वरूप अधिक धोकादायक होऊ शकते. सध्या अशा हल्ल्यांमुळे प्रामुख्याने आर्थिक नुकसान होत असले, तरी भविष्यात त्याचे परिणाम थेट मानवी जीवनावरही होऊ शकतात. २०२७ नंतरची परिस्थिती कशी असेल, याबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
AI च्या गैरवापरातून तीन प्रकारचे मोठे धोके निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पहिला धोका म्हणजे महत्त्वाच्या डिजिटल आणि पायाभूत यंत्रणांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता. दुसरा धोका जैविक शस्त्रांच्या निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाण्याचा आहे. तर तिसरा धोका म्हणजे जागतिक स्तरावरील नेते आणि सरकारे निर्णय घेण्यासाठी AI प्रणालींवर अतिप्रमाणात अवलंबून राहण्याचा आहे. त्यामुळे मानवी निर्णय प्रक्रियेवरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
संभाव्य संकटाचा विचार करून जुर्कोविच यांनी कुटुंबीयांना काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. घरात किमान दोन आठवडे पुरेल एवढे अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवण्याबरोबरच काही रोख रक्कमही जवळ ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सायबर हल्ल्यांमुळे ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या सेवा विस्कळीत होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, २०२७ मध्ये कोविड-१९ महामारीपेक्षाही गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असा अंदाज जुर्कोविच यांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक इशारा आणि संभाव्य धोक्यांबाबतचा अंदाज असून, २०२७ मध्ये असे संकट निश्चितच येणार असल्याचे कोणतेही भाकीत नाही.