वर्धा,
action-taken-following-high-court-order येथील अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल्ल टोपले यांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार शुक्रवार २७ रोजी हा निलंबन आदेश जारी करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रिट याचिका आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत तपासणी अहवालातील त्रुटींच्या पृष्ठभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.
शासनाच्या आदेशानुसार, प्रफुल्ल टोपले यांच्या कार्यकाळात येथील आस्थापनांची तपासणी करताना अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणी अहवालातून निदर्शनास आले होते. या त्रुटींवर सुधारणा सूचना देणे, आवश्यक कारवाई करणे आणि वरिष्ठांना अहवाल सादर करणे अपेक्षित असताना त्याबाबत योग्य कार्यवाही झाली नसल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
याशिवाय, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या., गोसंवर्धन गोरस भंडार येथील तपासणीदरम्यानही अन्न सुरक्षा व मानके कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन आढळल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणातही आवश्यक सुधारात्मक कार्यवाही करण्यात आली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयीन संदर्भ आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या कार्यवाहीचा विचार करून शासनाने टोपले यांच्याकडून खुलासा मागविला होता. मात्र, सादर केलेला खुलासा, उपलब्ध अभिलेख आणि पदनिर्देशित अधिकार्याची वैधानिक जबाबदारी यांचा विचार करता तो समाधानकारक नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ जुलै रोजी दिलेल्या आदेशानंतर ८ जुलै रोजी सुधारणा सूचना २७ जुलै रोजी फेरतपासणी आणि पुढील सुनावणीची कार्यवाही करण्यात आल्याचा उल्लेखही निलंबन आदेशात आहे.
दरम्यान, निलंबन कालावधीत टोपले यांचे मुख्यालय मुंबई येथील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. या काळात सक्षम प्राधिकार्याच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. विशेष म्हणजे, हा निलंबन आदेश अंतिम निर्णय नसून प्रस्तावित विभागीय चौकशीदरम्यान करण्यात आलेली अंतरिम प्रशासकीय कारवाई असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे.