नाशिक,
simhastha २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि अपघातमुक्त पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्यादरम्यान उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींचा विचार करून विविध शासकीय विभागांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार केले जात आहेत. गर्दी नियंत्रणापासून अग्निसुरक्षा आणि औद्योगिक सुरक्षेपर्यंत सर्व बाबींचे नियोजन करण्यात येत असून, ‘शून्य अपघात’ हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांचे सादरीकरण केले. संभाव्य धोके ओळखणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य राबविणे यावर बैठकीत विशेष चर्चा झाली.
कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे नियोजन, अग्निसुरक्षा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याशिवाय आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि यंत्रसामग्री किती उपलब्ध आहे, याचाही आढावा घेण्यात आला. भाविकांच्या वाहतुकीसाठी अंतर्गत आणि बाह्य वाहनतळांची व्यवस्था, पार्किंगची क्षमता तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्थेबाबतही नियोजन करण्यात येत आहे.
औद्योगिक सुरक्षेच्या मुद्द्यावरही प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. कारखान्यांमध्ये वापरली जाणारी धोकादायक रसायने आणि वायू यांचे उत्पादन, साठवणूक, हाताळणी व वाहतूक यासंदर्भातील माहिती बैठकीत सादर करण्यात आली. रसायने किंवा वायूंची गळती, आग अथवा स्फोटासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला.
आपत्तीच्या वेळी विविध विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठी प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे, संपर्क व्यवस्था सक्षम ठेवणे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियमित प्रात्यक्षिक सराव करण्यावरही चर्चा झाली. याशिवाय स्वयंसेवकांची आवश्यकता असल्यास संबंधित विभागांनी त्याबाबत माहिती द्यावी. उपलब्ध मनुष्यबळानुसार प्राधिकरणाकडून पुढील कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सर्व विभागांना १५ डिसेंबर २०२६ पर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. कुंभमेळ्याचे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी प्रत्येक विभागाने सक्षम नियोजन करावे आणि एकमेकांच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, कुंभमेळा तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंते, नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि सल्लागार उपस्थित होते.