अफगाणिस्तानातील शाळेजवळ स्फोटाचा कहर

७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १०० जखमी

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
काबूल,
afghanistan-kunar-school-blastअफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार प्रांतात शनिवारी एका माध्यमिक शाळेत झालेल्या भीषण स्फोटात किमान 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर सुमारे 100 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तालिबानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.
 

afganistan 
प्राथमिक माहितीनुसार शाळेजवळ खाणकाम करणाऱ्या कंपन्यांच्या मालकीचा स्फोटकांचा साठा असलेल्या गोदामातून हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुनार प्रांतात अनेक खाणकाम प्रकल्प सुरू आहेत. कुनार प्रांतातील अंदार सेर परिसरात असलेल्या शाळेत सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. कुनार प्रांतीय पोलीस मुख्यालयाचे प्रवक्ते फरीद देहकान यांनी ही माहिती दिली.
 
या स्फोटात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची तातडीने माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुनार प्रांतातील तपास पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत, असे पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले.
 
दरम्यान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ऑगस्ट महिन्यात एका शाळा संकुलावर हँड ग्रेनेडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 9 ते 14 वयोगटातील 40 हून अधिक मुले जखमी झाली होती. या घटनेनंतर काही महिन्यांतच आता कुनारमधील शाळेजवळ स्फोटाची घटना घडली आहे.