
१७ डिसेंबर २०२६ रोजी भारतात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मार्व्हल विश्वातील अनेक लोकप्रिय सुपरहिरोंची झलक पाहायला मिळते. अॅव्हेंजर्स, एक्स-मेन आणि फॅन्टास्टिक फोर या तीन वेगवेगळ्या विश्वांतील नायक एकाच चित्रपटात एकत्र येणार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. याशिवाय, डॉ. डूम या खलनायकाची दमदार एंट्रीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरमधील दृश्यांमुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत चाहत्यांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’च्या नव्या ट्रेलरने ५६३ दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी याच चित्रपटाच्या टीझरला अवघ्या २४ तासांत ५०३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. तसेच २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेडपूल अँड वुल्व्हरीन’च्या सुपर बाउल टीझरने ३६५ दशलक्ष व्ह्यूज मिळवले होते. मात्र, या दोन्ही विक्रमांना मागे टाकत ‘डूम्सडे’च्या ट्रेलरने नवा इतिहास घडवला आहे.
चित्रपटाच्या कथानकात तीन वेगवेगळ्या सुपरहिरो विश्वांतील पात्रे एका मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र येणार आहेत. संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणाऱ्या भीषण परिस्थितीशी त्यांना लढा द्यावा लागणार आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या अशा अस्तित्वाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे सुपरहिरो एकत्र कसे येतात, याची झलक चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कथानकातील नवे ट्विस्ट आणि सुपरहिरोंमधील संघर्ष याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
अँथनी रुसो आणि जो रुसो या बंधूंनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर केविन फाइगी, लुईस डी’एस्पोसिटो आणि जोनाथन श्वार्ट्झ यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची मोठी फळी एकत्र आली आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ख्रिस इव्हान्स, ख्रिस हेम्सवर्थ, पेड्रो पास्कल, पॉल रुड, अँथनी मॅकी, फ्लॉरेन्स प्यू, व्हेनेसा किर्बी, एबॉन मॉस-बॅक्रॅक, वायट रसेल, चॅनिंग टेटम आणि सिमू लिऊ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
याशिवाय इयान मॅककेलेन, हेली अॅटवेल, टॉम हिडलस्टन, जेम्स मार्सडेन, पॅट्रिक स्टीवर्ट, जोसेफ क्विन, सेबॅस्टियन स्टॅन, डेव्हिड हार्बर, लेटिशिया राइट, लुईस पुलमन, केल्सी ग्रामर, कॅथरीन न्यूटन, डॅनी रामिरेझ, विन्स्टन ड्यूक, अॅलन कमिंग, हॅना जॉन-कामेन, रेबेका रोमिजन, अॅलेक्स लिव्हिनाली, माबेल कॅडेना आणि टेनोच हुएर्टा मेजिया हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. एवढ्या मोठ्या कलाकारांच्या फळीमुळे हा चित्रपट मार्व्हलच्या चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
विशेष म्हणजे, भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट अमेरिकेतील प्रदर्शनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १७ डिसेंबर २०२६ रोजी पाहता येणार आहे. भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच ‘मार्व्हल प्रेझेंटेड इन इन्फिनिटी व्हिजन’सह अन्य प्रीमियम फॉरमॅट्समध्येही तो प्रदर्शित केला जाणार आहे. ट्रेलरने आधीच लोकप्रियतेचे नवे शिखर गाठल्याने प्रत्यक्ष प्रदर्शनावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठी कमाई करतो, याकडे आता चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.