बडनेऱ्यात व्यापाऱ्यांवर हल्ला, बाजारपेठ बंद

पाच आरोपी अटकेत, अन्य फरार

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
अमरावती,
badnera-market-attack-five-arrestedबडनेरा नवी वस्ती येथील जयस्तंभ चौक परिसरातील गांधी मार्केटमध्ये दुकान बंद करण्याच्या वादातून कापड व्यापारी आणि त्याच्या नातेवाईकांवर चाकू, कैची व इतर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले. घटनेच्या निषेधार्थ २८ नोव्हेंबर रोजी बडनेरा येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून संताप व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून पाच मुख्य आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
जखमी व्यापारी सागर पंजवाणी (३१) यांच्या बयाणानुसार, गांधी मार्केटमध्ये त्यांचे ‘स्वामी क्लॉथ स्टोअर्स’ असून बाजूलाच मोठे वडील परशराम पंजवाणी यांचे ‘राधा साडी सेंटर’ आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता निशांत डोंगरे याने दुकान बंद करण्यासाठी धमकावले.
 

amaravati 
सागर यांनी नकार दिल्यानंतर तो निघून गेला. मात्र, पंधरा मिनिटांनी निशांत साथीदारांसह परत आला आणि दुकानात घुसून हल्ला केला. आरोपी निखिल निंबर्ते याने सागर यांच्या पसळीजवळ चाकूने वार केला, तर सिद्धार्थ डोंगरे याने कैचीने छातीवर वार केल्याचा आरोप आहे. मध्यस्थी करण्यासाठी आलेले परशराम पंजवाणी आणि जितेंद्र पंजवाणी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. प्रथमेश सपाटे याने सिमेंट ब्लॉकने परशराम यांच्या डोक्यावर, तर आयुष मेश्राम याने जितेंद्र यांच्या पाठीवर चाकूने वार केला. अन्य आरोपींनीही लोखंडी स्टँड, विटा व दगडांनी हल्ला केला. घटनेनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून गुंडगिरीविरोधात आवाज उठवला. पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन सुरक्षेचे आश्वासन दिले. हत्येच्या प्रयत्नासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपींवर मकोका लावा
व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपायोजना करण्याच्या मागणीसाठी शनिवारी सर्व व्यापाऱ्यांनी बडनेरा पोलिस ठाण्यावर धडक देऊन मागणीचे निवेदन ठाणेदारांना दिले. यावेळी बडनेरा झोन सभापती किशोर जाधव, शैलेंद्र मेघवाणी, लक्ष्मीचंद चेलाणी, श्याम मुलाणी, जितू मोटवाणी, चंदूमल बिदलाणी यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.