लग्नाचा आनंद क्षणात विरला! एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
श्रीनगर
baramulla road accident
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी रात्री भीषण रस्ते अपघात घडला. उरी परिसरातील गोहलान येथे एक एसयूव्ही वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून, ११ वर्षांची एक बालिकाही गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबातील सदस्य जवळच्या गावात आयोजित करण्यात आलेल्या लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते वाहनाने घरी परतत असताना गोहलान परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर एसयूव्ही थेट खोल दरीत कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनातील चालकासह पाचही जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २६ वर्षीय सैयद शफीक शाह, त्यांची २५ वर्षीय पत्नी रशीदा बानो, १७ वर्षीय बहीण दिलनाज फातिमा आणि २७ वर्षीय चुलत बहीण शाहिदा फातिमा यांचा समावेश आहे.या अपघातात जखमी झालेल्या ११ वर्षीय बालिकेला पुढील उपचारांसाठी बारामुल्ला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.लग्नसमारंभातील आनंदाचा क्षण संपवून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काही क्षणांतच दुःखाचा डोंगर कोसळला. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.