बंगळुरू
murdered by boyfriend नोकरीच्या शोधात केरळमधून बंगळुरू येथे आलेल्या २२ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूच्या कॉटनपेट परिसरातील एका लॉजमध्ये ही घटना घडली. गंगा असे मृत तरुणीचे नाव असून, ती नर्सिंग पदवीधर होती. या प्रकरणी तिचा २३ वर्षीय प्रियकर गोकुळ कृष्ण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगाचे अन्य तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच संशयातून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हत्येत झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

गंगा आणि गोकुळ कृष्ण हे दोघेही नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केलेले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात दोघेही बंगळुरूमध्ये आले होते. २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी कॉटनपेट परिसरातील ओटीसी रोडवरील एका लॉजमध्ये खोली घेतली होती. याच खोलीत असताना गोकुळने गंगाच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. तिचे अन्य एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप त्याने केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाद विकोपाला गेल्यानंतर गोकुळने गंगाला मारहाण केली आणि तिची हत्या केली. मात्र, गंगावर संशय घेण्यामागील नेमके कारण काय होते, तसेच आरोपीने तिची हत्या नेमकी कोणत्या पद्धतीने केली, याबाबत पोलिसांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. या घटनेमागील संपूर्ण कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी लॉजमधील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. खोलीतील बेडवर तसेच जिन्यावर रक्ताचे डाग आढळून आल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खोलीची पाहणी केली. यावेळी तरुणीचा मृतदेह आढळून आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गोकुळ कृष्ण याला हत्येच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरील पुरावे, रक्ताचे डाग आणि इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी केली जात आहे. आरोपीची चौकशीही सुरू असून, या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.
चार वर्षे एकमेकांसोबत प्रेमसंबंधात असलेल्या दोघांच्या नात्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने या घटनेने बंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे. नोकरी आणि भविष्याची स्वप्ने घेऊन शहरात आलेल्या तरुणीचा संशयातून जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.