वर्धा,
bold-theft-in-alodi शहरालगतच्या आलोडी परिसरात वॉर्ड ४ मध्ये चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहेत. सदस्य झोपले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करुन ५ लाख रोख आणि २० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना आज शनिवार २७ रोजी सकाळी उघडकीस आली. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुधाकर भोयर यांचे आलोडी परिसरातील वॉर्ड ४ मधील संभाजीनगरात दोन मजली घर आहे. ते त्यांच्या पत्नीसह बाहेरगावी गेले असता त्यांनी दागिने आणि पाच लाख रुपये त्यांच्या बेडरूममध्ये कपाटात ठेवले होते. शुक्रवारी रात्री त्यांची दोन्ही मुले झोपले असताना चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घराच्या मागच्या दारातून प्रवेश करून सुधारक भोयर यांच्या बेडरुमधील कपाटात ठेवलेली ५ लाखांची रोख आणि २० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मुले आणि स्नुषांनी सकाळी उठल्यानंतर बघितले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आजुबाजुचे सीसीटीव्ही तपासले असता काही फुटेज त्यांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या अडीच ते तीन महिन्यांत आलोडी परिसरातील वॉर्ड ४ मध्ये पाच ते सहा घरफोड्या झाल्या आहेत. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पंचनामा करून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहेत. पण, अद्याप एकाही चोरीचा उलगडा झालेला नाही. या परिसरात पोलिसांनी सातत्याने गस्त घालण्याची मागणी जोर धरत आहे.