रंगय्यापल्ली,
building-worth-22-lakhs ग्रामपंचायतीची इमारत उभी राहिली, लाखोंचा निधी खर्च झाला, मात्र, बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही. सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील सुमारे 22 लाख रुपये खर्चाच्या नवीन ग्रामपंचायत इमारतीतील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यापूर्वी या कामांबाबत तक्रारी करण्यात आल्या, वृत्तपत्रांतूनही प्रश्न उपस्थित झाले. तरीही अपूर्ण कामांचा तिढा कायम असताना आता 29 नोव्हेंबरच्या लोकार्पण सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
इमारतीत दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पची व्यवस्था नसल्याचा मुद्दा यापूर्वीच उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी याकडे लक्ष दिले गेले नाही. आता लोकार्पण असल्याने घाईघाईने तात्पुरता रॅम्प उभारण्यात आला आहे. इमारतीच्या परिसरात इतर अपूर्ण कामेही उरकण्याची लगबग सुरू आहे.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी 25नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देऊन लोकार्पणापूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहासह अन्य सुविधांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. या पत्रानंतर कामांना अचानक वेग आल्याचे दिसत आहे.
मात्र, प्रश्न केवळ अपूर्ण कामांचा नाही. बांधकाम नियमानुसार झाले काय, कामात वापरलेल्या साहित्याचा दर्जा काय आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामांच्या तक्रारींची चौकशी झाली काय, याचा हिशेब अद्याप समोर आलेला नाही. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या इमारतीच्या कामाची तांत्रिक तपासणी करून दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आमदारांच्या उपस्थितीत इमारतीचे लोकार्पण होणार आहे. मात्र, लोकार्पणाची तयारी पूर्ण करण्याची घाई सुरू असताना बांधकामाच्या दर्जाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांचे काय? हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.