कारंजा लाड,
car-accident-on-samruddhi-expressway नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कारचालकाला अचानक डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून ती महामार्गावरील डिव्हायडरला धडकली. शनिवारी सकाळी ७.३० वाजता समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातात कारमधील दोघे जण किरकोळ जखमी झाले. सुभाष शंकर पाटील वय ६१ रा. पालघर आणि रवी गोपाल साव वय ३० वर्ष रा. मुंबई अशी जखमींची नावे आहेत.सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली.

प्राप्त माहितीनुसार, कार क्रमांक एमएच ४८ बीटी ९८४७ ही कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होती. दरम्यान, चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कार महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. या धडकेत कारचे नुकसान झाले असून, त्यातील दोघे जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट इंगळे आणि डॉ. गणेश यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतच प्रथमोपचार दिले. यावेळी समृद्धी महामार्ग अग्निशामक दलाचे पथक तसेच पोलिस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. अपघात घडताच तातडीने मदतकार्य सुरू झाल्याने जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. महामार्गावरील १०८ रुग्णवाहिका पथकाने दाखविलेल्या तत्परतेचे यावेळी कौतुक होत आहे. वाहनचालकांनी लांबचा प्रवास करताना पुरेशी विश्रांती घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहनही या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.