रोहितच्या नेतृत्वातही मुंबईसमोर आव्हाने!

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
मुंबई,
rohits-leadership आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. हार्दिक पांड्याच्या ट्रेडनंतर फ्रँचायझीने हा निर्णय घेतला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असल्याने त्याच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, केवळ कर्णधार बदलल्याने संघाचे नशीब बदलणार नाही, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केले आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या काही महत्त्वाच्या कमकुवत बाजूंवरही प्रकाश टाकला.
 
rohits-leadership
 
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये अखेरचे आयपीएल विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर संघाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांच्या नेतृत्वाखालीही संघाची सर्वोत्तम कामगिरी चौथ्या स्थानापर्यंतच मर्यादित राहिली. त्यामुळे संघाच्या अपयशामागे केवळ कर्णधारपद हे कारण नसून आणखी काही गंभीर समस्या असल्याचे अश्विनने नमूद केले.
 
रोहित शर्माचे मुंबई इंडियन्समधील योगदान मोठे असून त्याला फ्रँचायझीच्या यशस्वी परंपरेपासून वेगळे करता येणार नाही, असेही अश्विन म्हणाला. चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याप्रमाणेच रोहित आणि मुंबई इंडियन्स यांचे नाते आहे. रोहितकडे पुन्हा नेतृत्व सोपवण्यामागे संघातील जुनी संस्कृती आणि एकजूट पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. ड्रेसिंग रूममधील खेळाडूंचा रोहितवर विश्वास आणि आदर आहे. किरॉन पोलार्डसोबतही त्याचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला असावा.
 
गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचा योग्य वापर करण्याची क्षमता रोहितमध्ये असल्याचे अश्विनने मान्य केले. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, विल जॅक्स आणि मिचेल सँटनर यांच्यासारखे पर्याय मुंबईकडे आहेत. अर्शदीपच्या समावेशामुळे संघाची वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत होऊ शकते. मात्र, पाचव्या गोलंदाजाची निवड आणि दुसऱ्या भारतीय गोलंदाजाचा योग्य वापर हे रोहितसमोरील महत्त्वाचे निर्णय असतील. विशेषतः भारतीय फिरकीपटूची योग्य निवड करणे मुंबईसाठी निर्णायक ठरू शकते.
 
अश्विनच्या मते, रोहितच्या नेतृत्वाखाली संघाकडून मैदानावर होणाऱ्या चुका कमी होऊ शकतात; मात्र त्याच्या कर्णधारपदामुळेच विजेतेपद मिळेल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. २०२० नंतरही मुंबईकडे मजबूत गोलंदाजी होती, तरीही संघाला विजेतेपद पटकावता आले नाही. त्यातच संघातील काही अनुभवी खेळाडूंचे वय वाढत असून बुमराह दुखापतीतून पुनरागमन करत आहे. दुसरीकडे, रोहित शर्माची कारकीर्दही अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र आहे. एकूणच, रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदाच्या आशा नक्कीच वाढल्या आहेत. मात्र, संघातील कमकुवत बाजू दूर करून योग्य संयोजन तयार करणे हेच आगामी हंगामातील यशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.