क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर रमले बोर सफारीत!

वन्यजीव व जैवविविधतेने भारावले

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
वर्धा,
cricketer-shardul-thakur भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बोरधरण सफारी गेट येथे जंगल सफारीचा आनंद घेतला. सकाळी आणि दुपारच्या सफारीदरम्यान त्यांनी बोर जंगलातील निसर्गसौंदर्य, वन्यजीव आणि समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेतला. मात्र, सफारीदरम्यान वाघाने हुलकावणी दिल्याने वाघाचे दर्शन होऊ शकले नाही.
 
 

cricketer-shardul-thakur
 
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या शार्दूल ठाकूर यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगल सफारीचा अनुभव घेतला. बोरच्या निसर्गरम्य वातावरणातील शांतता, वनसंपदा आणि जैवविविधतेने ते भारावून गेले. सफारीचा आनंद घेत त्यांनी जंगलातील निसर्गवैभव जवळून अनुभवले.
 
 
बोर व्याघ्र प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाचा वन्यजीव पर्यटन परिसर असून, येथील वनसंपदा, वन्यजीव आणि निसर्गवैभव पर्यटकांना आकर्षित करत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह पर्यटक बोर जंगल सफारीसाठी भेट देत असल्याने या पर्यटनस्थळाची ओळख राज्यासह देशभरात अधिक व्यापक होत आहे. याच आठवड्यात विदेशी पर्यटकांनी सुद्धा बोरच्या सफारीचा आनंद घेतला होता. यापूर्वीही राजस्थान रॉयल्सच्या संघातील काही दिग्गज क्रिकेटपटूंनी भेट देत सफारी केली होती. क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्या भेटीमुळेही बोरच्या वन्यजीव पर्यटनाला प्रसिद्धी मिळण्यास हातभार लागणार आहे. यावेळी बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी शार्दूल ठाकूर यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक आशिष देशमुख, दत्तात्रय लोंढे आणि बोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर उपस्थित होते.
 
भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्या बोर व्याघ्र प्रकल्पातील भेटीमुळे बोर जंगल सफारीच्या पर्यटन आकर्षणाला आणखी प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार आहे. अशा मान्यवरांच्या भेटींमुळे निसर्ग आणि वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने बोरचे महत्त्व अधिक वाढणार असल्याची प्रतिक्रीया वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी दिली.