नवी दिल्ली
arrest jaish-e-mohammed suspect दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटनेत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर विशेष पथकाने संबंधित संशयिताच्या सोशल मीडिया हालचालींवर अनेक दिवस लक्ष ठेवले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या संशयिताचे गुजरातमध्ये अटक करण्यात आलेल्या जैशच्या कथित दहशतवाद्याशी काही संबंध आहेत का, याचाही तपास आता केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय सोशल मीडियाचा वापर करून भारतीय तरुणांना लक्ष्य करीत आहे. ऑनलाइन माध्यमातून त्यांचे विचार प्रभावित करून दहशतवादी कारवायांसाठी भरती करण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या तरुणाचीही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जैशशी संबंधित नेटवर्कमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी वडोदरा येथे जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली होती. मोहम्मद सहारुल इस्लाम कबीरुद्दीन असे त्याचे नाव असून, तो आसाममधील करीमगंजचा रहिवासी आहे. भारतीय वायुदलाच्या वडोदरा येथील तळासह अन्य महत्त्वाच्या सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य करण्याचा त्याचा कट असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
गुजरात एटीएसने गुरुवारी रात्री हलोल-वडोदरा मार्गावरील एका हॉटेलजवळ ही कारवाई केली. दाहोद येथून शस्त्रे घेऊन परतत असताना आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडून एके-४७ रायफलसारखी दिसणारी स्वयंचलित असॉल्ट रायफल, दोन रिकाम्या मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय जैश-ए-मोहम्मदचा झेंडा, दोन मोबाइल फोन, सिमकार्ड आणि २० हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांच्या हाती लागली.
तपास यंत्रणांना आरोपीच्या मोबाइल फोनमध्ये वडोदरा येथील भारतीय वायुदलाच्या तळाची छायाचित्रेही आढळली आहेत. त्यामुळे या सुरक्षा आस्थापनाची माहिती गोळा करून संभाव्य हल्ल्याची तयारी केली जात होती का, याचा तपास सुरू आहे. गुजरात एटीएसच्या मते, आरोपीकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि मोबाइलमधील माहिती या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची ठरू शकते.
दिल्ली आणि गुजरातमध्ये समोर आलेल्या या दोन्ही घटनांमध्ये काही परस्परसंबंध आहेत का, याचा तपास संबंधित यंत्रणा करीत आहेत. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक अटक केलेल्या संशयिताची चौकशी करून त्याचे ऑनलाइन संपर्क, भरतीचे माध्यम आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्क यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषतः गुजरातमध्ये पकडलेल्या आरोपीशी त्याचा संपर्क होता का, यावर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित झाले आहे.