धुळीला ‘व्हॅक्यूम’चा दणका

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
delhi pollution control
राजधानी दिल्लीतील वाढते धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारने यांत्रिक रस्ते स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या १० अत्याधुनिक मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीनना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या यंत्रांसोबत पाण्याचे टँकर आणि कचरा वाहून नेणारी डस्ट डंप वाहनेही सेवेत दाखल करण्यात आली आहेत. आधीपासून कार्यरत असलेल्या स्वच्छता यंत्रणांना या नव्या वाहनांची मदत मिळणार आहे.



नव्याने दाखल झालेल्या १० मशीनमध्ये चार घनमीटरपेक्षा अधिक क्षमता असलेले एक मोठे यंत्र आहे. उर्वरित नऊ मशीन मध्यम आणि लहान क्षमतेच्या असून, त्यांची क्षमता प्रत्येकी दोन घनमीटर आहे. या मशीनच्या माध्यमातून रस्त्यांवर साचलेली कोरडी धूळ ब्रशच्या साहाय्याने गोळा केली जाणार आहे. त्यानंतर व्हॅक्यूम प्रणालीद्वारे धूळ आणि कचरा यंत्रातील कंटेनरमध्ये जमा केला जाईल. स्वच्छता करताना पाण्याची फवारणी करण्याची सुविधाही या मशीनमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील धूळ पुन्हा हवेत उडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

वाहतुकीची वर्दळ अधिक असलेल्या आणि धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या रस्त्यांवर या मशीनचा प्राधान्याने वापर केला जाणार आहे. एमसीडीच्या माहितीनुसार, प्रत्येक मशीनच्या माध्यमातून दररोज सुमारे ७० किलोमीटरपर्यंत रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य आहे. मात्र, या यंत्रांचा प्रत्यक्ष फायदा किती होईल, हे त्यांची कोणत्या रस्त्यांवर आणि किती नियमितपणे नियुक्ती केली जाते, यावर अवलंबून राहणार आहे.

या नव्या मशीनमध्ये जीपीएस तंत्रज्ञानासह आधुनिक देखरेख यंत्रणाही बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणते यंत्र कोणत्या रस्त्यावर किती वेळ कार्यरत होते, त्याने किती किलोमीटर परिसर स्वच्छ केला आणि किती कचरा गोळा केला, याची माहिती मिळू शकणार आहे. याशिवाय आधुनिक सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छता मोहिमेच्या कामकाजावर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार असून, संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणेही सोपे होईल, असा एमसीडी अधिकाऱ्यांचा दावा आहे.

दरम्यान, दिल्लीतील रस्त्यांची स्वच्छता आणि धूळ नियंत्रणासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्रीची संख्या अद्याप गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. उपलब्ध माहितीनुसार, एमसीडीकडे यापूर्वी केवळ ६६ मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन होत्या. केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार, दिल्लीसारख्या मोठ्या शहरासाठी सुमारे ५०६ मशीन आवश्यक आहेत. त्यामुळे नव्याने १० मशीन दाखल झाल्यानंतरही उपलब्ध यंत्रसामग्री आणि प्रत्यक्ष गरज यांच्यातील अंतर कायम आहे.

ही तफावत भरून काढण्यासाठी आगामी काळात आणखी ६० स्वीपिंग मशीन एमसीडीच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली. रस्त्यांची नियमित आणि प्रभावी स्वच्छता करून धुळीमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न असला, तरी दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी या मशीनचा नियमित वापर आणि व्यापक कार्यक्षमता कितपत परिणामकारक ठरते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.