नवी दिल्ली
delhi shocking incident घरात आईसोबत झालेल्या वादाचा राग अनावर झाल्याने तिसऱ्या मजल्यावरून भरलेला एलपीजी सिलिंडर खाली फेकल्याची धक्कादायक घटना दक्षिण-पश्चिम दिल्लीतील बिंदापूर परिसरात घडली. हा सिलिंडर इमारतीखाली उभ्या असलेल्या ३० वर्षीय साहिल या तरुणाच्या डोक्यावर कोसळला. या भीषण घटनेत गंभीर जखमी झालेल्या साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तालाब वाला पार्क परिसरात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल शुक्रवारी सायंकाळी संबंधित इमारतीच्या बाहेर उभा होता. त्याचवेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून अचानक भरलेला गॅस सिलिंडर खाली कोसळला. थेट साहिलच्या डोक्यावर सिलिंडर आदळल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी दीनदयाळ उपाध्याय (डीडीयू) रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी इमारत मालकाचा पुतण्या शिवम शर्मा याला ताब्यात घेतले आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमला मद्यपानाचे व्यसन असून, मद्यधुंद अवस्थेत तो अनेकदा घरात गोंधळ घालत असे. त्याच्या या वर्तनाबाबत शेजाऱ्यांनी यापूर्वी इमारत मालकाकडे तक्रारीही केल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी शिवम आणि त्याच्या आईमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने सिलिंडर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.
मात्र, सिलिंडर जाणीवपूर्वक फेकण्यात आला की आईसोबत झालेल्या वादादरम्यान तो अनवधानाने खाली पडला, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमागील नेमके कारण आणि शिवमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मृत साहिल याच इमारतीच्या तळमजल्यावर पत्नी आणि एक वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता. घराबाहेर उभ्या असलेल्या साहिलवर अचानक काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-मुलाच्या घरगुती वादातून घडलेल्या या घटनेत एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.