नवी दिल्ली,
delimitation-50-percent-seat-increaseमतदारसंघ परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर लोकसभा तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या ५० टक्क्यांनी वाढणार आहे. कोणत्या राज्यात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या किती वाढवायची, हे ठरवण्याची जबाबदारी परिसीमन आयोगाची असेल. प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्यातून १० सहयोगी सदस्य निवडले जाईल.
केंद्र सरकार लोकसभा आणि विधानसभेतील जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याची आणि महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्याची तयारी करत आहे. सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. प्रस्तावित ५० टक्के वाढीनंतर ही संख्या अंदाजे ८१५ पर्यंत पोहोचू शकते. त्याचबरोबर, महिलांना संसद आणि विधानसभेत एक तृतीयांश प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्गही मोकळा होईल. परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोग स्थापन केला जाईल. आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांचे नामनिर्देशित निवडणूक आयुक्त आणि संबंधित राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आयोगाचे इतर दोन सदस्य असतील. आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश भूषवतील.
लोकसभा सभापती करणार सदस्यांची निवड
प्रत्येक राज्यातून पाच लोकसभा खासदारांना लोकसभा सभापती नामनिर्देशित करतील आणि पाच आमदारांना संबंधित राज्य विधानसभेचे सभापती नामनिर्देशित करतील. हे सहयोगी सदस्य आयोगाच्या बैठका आणि चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतील, मात्र त्यांना मतदान करण्याचा किंवा आयोगाच्या निर्णयांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नसेल.
२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा वापर
मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्यासाठी २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा वापर केला जाईल. तसेच, राज्यांमधील लोकसभा जागांचे प्रमाण १९७१ च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावात जम्मू-काश्मीरसंदर्भात स्वतंत्र व्यवस्था आहे. २०२३ च्या नारी शक्ती वंदन कायद्याने आरक्षण पुढील जनगणना आणि त्यानंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडले होते.
महिलांना १५ वर्षांसाठी आरक्षण
महिलांसाठीचे आरक्षण २०२३ च्या संविधान दुरुस्तीच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून १५ वर्षांपर्यंत राहील. संसद कायदा करून त्याचा कालावधी वाढवू शकेल.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव जागा राखीव असलेल्या मतदारसंघांमध्ये निश्चित केल्या जातील.
विधेयक मंजूर करण्यासाठी ३५९ मतांची गरज
- लोकसभेत सध्या ५४० सदस्य आहेत आणि तीन जागा रिक्त आहेत. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचे निलंबन कायम राहिल्यास, अध्यक्षांसह ५३९ सदस्य सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.
- सभापती वगळता सर्व ५३८ सदस्य मतदान करत असल्यास, विधेयक मंजूर करण्यासाठी ३५९ मतांची गरज असेल
-विधेयकात केंद्रशासित प्रदेशांमधील प्रतिनिधित्व आणि निवडणूक प्रणालीमध्ये बदल प्रस्तावित आहेत
जागांच्या प्रतिनिधित्वात बदल होईल का?
मतदारसंघांची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर केली जाते. तथापि, सरकारच्या प्रस्तावानुसार राज्यांचा एकूण वाटा सध्याच्या गुणोत्तराच्या जवळपास कायम ठेवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या लोकसभा जागा ८० वरून १२० पर्यंत वाढू शकतात. तामिळनाडूच्या जागा ३९ वरून ५९ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
जम्मू आणि काश्मीरबाबत कोणते बदल केले जातील?
दिल्ली आणि पुदुचेरीप्रमाणेच, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्याच्या व्याख्येत समावेश केला जाईल. याशिवाय, २०५१ पर्यंत राष्ट्रपती निवडणुकीतील आमदारांच्या मतांचे मूल्य १९७१ च्या जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.