नवी दिल्ली
delimitation bill 2026 live देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील परिसीमन विधेयक आणण्याची केंद्र सरकारने तयारी पूर्ण केली आहे. या विधेयकाला शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर संसदेच्या सर्व सदस्यांना विधेयकाच्या प्रती वितरित करण्यात आल्या असून, त्याचा सविस्तर अभ्यास करून काही शंका किंवा आक्षेप असल्यास ते मांडण्याची सूचना खासदारांना करण्यात आली आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत हे विधेयक मांडले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या विधेयकासाठी आवश्यक राजकीय पाठिंब्याचीही जुळवाजुळव केल्याचे वृत्त आहे. विधेयकाला दोनतृतीयांश बहुमत मिळविण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, विधेयकाच्या प्रती सर्व खासदारांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने संसदेतील चर्चेची तयारी सुरू झाली आहे. विधेयकासंदर्भात सदस्यांकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना आणि आक्षेपांना उत्तर देण्यास सरकार तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रस्तावित विधेयकानुसार देशातील सर्व राज्यांच्या लोकसभा मतदारसंघांची संख्या सध्याच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लोकसभेतील एकूण जागांची कमाल मर्यादा ८५० निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पुढील २५ वर्षांसाठी जागांची संख्या स्थिर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. विधानसभांच्या बाबतीतही असाच निर्णय प्रस्तावित असून, प्रत्येक राज्यातील विधानसभा सदस्यसंख्येत ५० टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. विधानसभेतील एकूण जागांची मर्यादा ६५० पेक्षा अधिक असणार नाही. सर्व राज्यांमध्ये समान ५० टक्के वाढीचे सूत्र लागू केल्यामुळे कोणत्याही राज्याच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होणार नसल्याचा सरकारचा दावा आहे.
या विधेयकाचा संबंध महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशीही जोडण्यात आला आहे. परिसीमनाची प्रक्रिया आणि महिला आरक्षणासंदर्भातील तरतुदी एकमेकांशी संबंधित असल्याने प्रस्तावित विधेयक मंजूर झाल्यास २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या आरक्षणानुसार लोकसभेतील सुमारे २७२ जागा महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रस्तावित विधेयकात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचाही (पीओके) उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यात पीओके भारतात समाविष्ट झाल्यास निवडणूक आयोग परिसीमन आयोगाच्या धर्तीवर तेथील निवडणूक मतदारसंघांची रचना आणि निवडणुकीचा नकाशा निश्चित करण्याची भूमिका बजावेल, अशी तरतूद विधेयकात असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, विधेयकाच्या प्रती मिळाल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांच्या भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचीही यासंदर्भात बैठक होणार असून, त्यात विधेयकाचा अभ्यास करून पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे. ३० नोव्हेंबरला लोकसभेत विधेयक सादर झाल्यानंतर त्यावर होणारी चर्चा आणि विविध पक्षांचा पाठिंबा याकडे देशाचे लक्ष लागले आहे.