मुंबई
dhadkan 2 update हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय प्रेमपटांमध्ये ‘धडकन’ या चित्रपटाचे नाव आजही आवर्जून घेतले जाते. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील प्रेमकथा, भावनिक प्रसंग आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. आता तब्बल २६ वर्षांनंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा मनोरंजनविश्वात सुरू झाली आहे. निर्माते ‘धडकन २’ तयार करण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, नव्या चित्रपटात पहिल्या भागातील कलाकारांची लोकप्रिय जोडी पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या ‘धडकन’मध्ये अक्षय कुमारने राम, शिल्पा शेट्टीने अंजली, तर सुनील शेट्टीने देव ही व्यक्तिरेखा साकारली होती. या तिघांच्या अभिनयामुळे चित्रपटातील प्रेमत्रिकोण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. मात्र, आगामी भागासाठी निर्माते नव्या कलाकारांना संधी देण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा मुख्य भूमिकांमध्ये दिसतील, अशी शक्यता सध्या कमी मानली जात आहे.
विशेष म्हणजे, सुनील शेट्टी मात्र ‘धडकन २’मध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या भागातील देव या भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. नव्या चित्रपटात त्याची पाहुण्या कलाकाराच्या स्वरूपात छोटी भूमिका असू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनासाठीही नव्या नावाची चर्चा सुरू आहे. पहिल्या ‘धडकन’चे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते. मात्र, आगामी चित्रपटासाठी निर्माते वेगळ्या दिग्दर्शकाचा विचार करत असल्याचे समजते. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे श्री नारायण सिंह यांच्याकडे ‘धडकन २’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, ‘धडकन २’ची निर्मिती अद्याप सुरुवातीच्या टप्प्यातच असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या पटकथेवर आणि पूर्वतयारीवर काम सुरू असून, प्रमुख भूमिकांसाठी नव्या कलाकारांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. मात्र, कोणत्याही कलाकाराच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तसेच निर्मात्यांकडून चित्रपटाची अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘धडकन २’ प्रत्यक्षात कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, नव्या कथेत कोणते कलाकार झळकणार आणि सुनील शेट्टी खरोखरच पाहुण्या भूमिकेत दिसणार का, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.