‘बॉम्ब फेकला तरी प्रेमच देणार

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
मुंबई
diljit dosanjh
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या मुंबईतील कॉन्सर्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रमाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या धमक्यांना न घाबरता दिलजीतने महालक्ष्मी रेसकोर्सवरील कार्यक्रमात आपल्या खास अंदाजात उत्तर दिले. ‘तुम्ही बॉम्ब फेकला तरी माझ्याकडून तुम्हाला प्रेमच मिळेल,’ अशा शब्दांत त्याने धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.



लोकांना धमकावून आणि भीती दाखवून माझ्या कार्यक्रमाला येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही दिलजीतने यावेळी सांगितले. द्वेषाला द्वेषाने उत्तर देण्याऐवजी प्रेम आणि सकारात्मकतेचा मार्ग निवडत त्याने उपस्थित चाहत्यांना शांततेचा संदेश दिला.

५०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त


कॉन्सर्टपूर्वी धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली होती. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात ५०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून कार्यक्रमस्थळाची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान दिलजीतने मुंबई पोलिसांचे विशेष आभार मानले. धमकीचे सावट असतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या चाहत्यांच्या धैर्याचेही त्याने कौतुक केले.

शहरों में बारूदों का मौसम है...'


धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दिलजीतने आपल्या बोलण्यातून शांततेचा संदेश दिला. 'शहरों में बारूदों का मौसम है, गाँव चलो ये अमरूदों का मौसम है,' असे म्हणत त्याने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वक्तव्याची आणि प्रेमाचा संदेश देण्याच्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.दिलजीतच्या मुंबईतील कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विरोध दर्शवला होता. महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचे सेवन होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. तसेच कॉन्सर्ट रद्द न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.दिलजीत दोसांझने 'इश्क दा उडा अडा' या अल्बममधून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'लक्क २८ कुड़ी दा', 'पटियाला पेग' आणि '५ तारा' यांसारख्या गाण्यांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. गायकीसोबतच अभिनय क्षेत्रातही त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.'जट्ट अँड ज्युलिएट', 'पंजाब १९८४', 'उडता पंजाब', 'गुड न्यूज' आणि 'अमर सिंह चमकीला' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. धमक्यांचे सावट असूनही मुंबईतील कॉन्सर्टला चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद आणि दिलजीतने दिलेला प्रेमाचा संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.