रेवती जोशी-अंधारे
gta 6 craze जगभरात गेमप्रेमींच्या कॅलेंडरवर १९ नोव्हेंबर ही तारीख 'मार्क' होती. या दिवसासाठी सुट्टीचे नियोजन, नवीन गेमिंग कन्सोलची तयारी, कुटुंबासोबत 'डू नॉट डिस्टर्ब'चा गमतीशीर करार, रात्री जागून खेळण्याचा बेत अशी जोरदार तयारी होती. तब्बल १३ वर्षांची प्रतीक्षा संपली आणि ‘ग्रँड थेफ्ट ऑटो’ अर्थात ‘जीटीए’ मालिकेतील सहावा भाग बाजारात दाखल झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३.७९ अब्ज डॉलरची विक्री नोंदवत ‘जीटीए ६’ने मनोरंजनविश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला. वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार द्विशतकी खेळीपेक्षाही सध्या जास्त चर्चा आहे ती व्हाइस सिटीच्या आभासी दुनियेची! आपणही जीटीएचा वेध घेऊ या.

‘ग्रँड थेफ्ट ऑटो’ या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ‘ओपन वर्ल्ड’!
खेळाडूला एका काल्पनिक शहरात मुक्तपणे फिरण्याचे आणि स्वतःच्या निर्णयानुसार खेळाचा अनुभव घेता येतो.
‘जीटीए’ची सुरुवात १९९० च्या दशकात स्कॉटलॅण्डमधील डंडी शहरात झाली. DMA Design या कंपनीने १९९५ मध्ये ‘रेस अँड चेस’ नावाने एक खेळ विकसित केला. चोर-पोलिस हा त्याचा मुख्य भाग होता. १९९७ मध्ये ‘ग्रँड थेफ्ट ऑटो’चा पहिला भाग आला. १९९८ मध्ये रॉकस्टार गेम्सची स्थापना झाली. सॅम हाउझर आणि डॅन हाउझर यांनी या मालिकेला जगभरात लोकप्रिय केले. नव्या खेळात आधुनिक व्हाइस सिटीतील या भागात जेसन डुव्हाल आणि लुसिया कामिनोस ही दोन प्रमुख पात्रे आहेत. या दोघांच्या नात्यातील गुंतागुंत आणि गुन्हेगारी जगतातील संघर्ष असे कथानक आहे.लॉजिटेकने जगभरातील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांसाठी ‘लॉगी गेम डे’ या नावाने सशुल्क सुटी जाहीर केली. जपानमधील ‘पालवर्ल्ड’ या गेमसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉकेटपेअर कंपनीने कर्मचाऱ्यांना १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान सुटी दिली. सुट्यांची ही बाब गंमतीशीर वाटली तरी त्यातून गेमिंगचे जागतिक सामर्थ्य दिसते.
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘जीटीए ६’ प्लेस्टेशन ५ आणि एक्सबॉक्स सिरीज एक्स/एस या मंचांवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या खेळाच्या ३.२५ कोटी प्रती आणि नंतर पहिल्याच दिवशी ३.७९ अब्ज डॉलर्सची विक्री नोंदवली. ‘जीटीए ६’चे लॉंचिंग ही एक मोठी व्यावसायिक घटना ठरली.
जगभरातील गेमिंग उद्योगात भारत मोठी बाजारपेठ आहे. स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोन्स आणि डिजिटल मनोरंजनाच्या सवयीमुळे गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढली आहे.FICCI-EY च्या ताज्या अहवालानुसार, भारतात गेम खेळणाऱ्यांची संख्या २०२४ मध्ये ४८.८ कोटी होती. २०२५ मध्ये हा आकडा ५१.७ कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. २०२६ मध्ये तो ५४.८ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यातील दहा कोटींहून अधिक जण दररोज गेम खेळत असल्याचा अंदाजही अहवालात आहे.
गेम निर्मिती, ॲनिमेशन, ग्राफिक्स डिझाईन, ध्वनिमुद्रण, ई-स्पोर्ट्स आणि डिजिटल मार्केटिंग अशा क्षेत्रांत रोजगाराच्या संधी आहेत. या उद्योगाकडे अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते.
‘जीटीए’ मालिकेत हिंसाचार, गुन्हेगारी, अमली पदार्थ, लैंगिक आशय आणि प्रौढांसाठीचे विनोद आहेत. अमेरिकेच्या ESRB या गेम वर्गीकरण संस्थेने ‘जीटीए ६’ला ‘Mature 17+’असे वर्गीकरण दिले आहे.एखाद्या काल्पनिक खेळात पोलिसांशी संघर्ष किंवा गुन्हेगारीच्या जगात वावरणे ही खेळाची रचना असू शकते. मात्र, हे मनोरंजन असेल तर त्याचे मानसिक परिणाम काय असू शकतात?
एकेकाळी मुलांच्या हातात विटीदांडू, लगोरी, क्रिकेटची बॅट आणि फुटबॉल असायचा. मैदानावर खेळताना धडपडणे, भांडणे आणि पुन्हा एकत्र येण्यातून व्यक्तीमत्व घडायचे. खेळातून पराभव स्वीकारण्याची ताकद आणि विजयाचा आनंद मिळायचा. आता, मैदानाची जागा मोबाईलच्या स्क्रीनने आणि मित्रांच्या सहवासाची जागा आभासी पात्रांनी घेतली आहे.
अभ्यास, वाचन, मैदानी खेळ, कुटुंबातील संवाद आणि सामाजिक जाणीवा यासाठी वेळच नसतो.
गेमिंग वाईट नाही. त्यातून कल्पनाशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता, तंत्रज्ञानाची ओळख आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मात्र, कोणता गेम खेळायचा, किती वेळ खेळायचा आणि तो कोणत्या वयोगटासाठी योग्य आहे, याचा विवेक गरजेचा आहे.
वयानुसार गेमची निवड, पालक नियंत्रण, स्क्रीन टाईमची शिस्त आणि मुलांशी नियमित संवाद महत्त्वाचा आहे. शाळांनीही डिजिटल साक्षरतेबरोबरच डिजिटल जबाबदारी शिकविण्याची गरज आहे.
तंत्रज्ञानाला विरोध करणे हा यावरचा उपाय नाही. उलट, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची समज मुलांमध्ये निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
१३ वर्षे वाट पाहिल्यानंतर चाहत्यांना व्हाइस सिटीची सफर घडली; पण या सफरीची किंमतही काही कमी नाही! गेममधील पात्राला हवे तेव्हा पुन्हा खेळ सुरू करता येतो; पण आयुष्यातील प्रत्येक चुकीला ‘रीस्टार्ट’चा पर्याय नसतो. त्यामुळे कंट्रोलर हातात घ्या, व्हाइस सिटीची सफरही करा; पण स्वनियंत्रणाचा विवेक सोडू नका.
९२२३७००२७७